शहरातील पुतळ्यांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट; राजकोट येथील घटनेनंतर महापालिकेला जाग

शहरात 50 हून अधिक पुतळे असले तरी महापालिकेकडून वर्षभर त्यांची देखभाल-दुरुस्ती करणे आवश्यक असताना केवळ जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशीच त्याकडे लक्ष दिले जाते. पुतळे बसविल्यानंतर आजतागायत त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट केलेले नाही. राजकोट किल्ल्यावर अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर पालिकेला जाग आली आहे. महापालिकेने शहरातील सर्व पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा केवळ आठ महिन्यांच्या आतच क्षतिग्रस्त झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण झाले होते. या घटनेनंतर राज्यात सामाजिक व राजकीय वादळ निर्माण झाले आहे. अखंड महाराष्ट्रातील शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शहरातील सर्व पुतळ्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती भवन विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख यांनी दिली. महापालिकेने पुतळ्यांची माहिती संकलित केली आहे. शहरात 50 हून अधिक अर्ध तसेच पूर्णाकृती पुतळे असून, त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी भवन विभागाकडे आहे. या ऑडिटमुळे पुतळे किती सुरक्षित आहेत, तसेच भविष्यात त्यांची सुरक्षा वाढविण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, या गोष्टी समोर येतील.

पालिकेकडून केवळ रंगरंगोटी

शहरात 50 हून अधिक पुतळे असले तरी महापालिकेकडून वर्षभर त्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष आहे. केवळ जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशीच त्याकडे लक्ष दिले जाते. यापूर्वी कधीही महापालिकेकडून पुतळे बसविण्यात आल्यानंतर त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट केलेले नाही. केवळ रंगरंगोटीसाठी प्रशासनाकडून निविदा काढल्या जातात. त्यातही काम झाले किंवा नाही, याकडेही कोणीही ढुंकूनदेखील पाहत नाही.