नवी मुंबई महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेली 14 गावे ही कल्याण लोकसभा मतदारसंघात येतात. लोकसभा निवडणुकीत पूत्र श्रीकांत शिंदे यांना फायदा व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही गावे निवडणुकीच्या तोंडावर तडकाफडकी नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला, असे तडाखे ऐरोलीतील भाजप आमदार गणेश नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत मिंधेंना लगावले. आम्ही दोघेही महायुतीत असल्यामुळे अपशकुन नको म्हणून मी या निर्णयाला विरोध केला नाही, असा गौप्यस्फोट करतानाच आता निवडणुका होऊन गेल्या आहेत. त्यामुळे या गावांतील खर्चाचा भार विनाकारण नवी मुंबईकरांवर येऊ देणार नाही. तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी जो प्रस्ताव पाठवला आहे त्यानुसारच या गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यात यावा. जर जोर जबरदस्ती केली तर एक लाख नवी मुंबईकरांचा मोर्चा पालिका मुख्यालयावर मोर्चा काढू, असा इशाराही त्यांनीही दिला.
नवी मुंबईत नव्याने समाविष्ट झालेल्या 14 गावांबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी क्रिस्टल हाऊस येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये गणेश नाईक म्हणाले की, माझा या गावांना कोणताही विरोध नाही. मात्र ही गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी जो प्रस्ताव शासनाला पाठवला आहे. त्याचे काटेकोरपणे पालन करावे. या गावांच्या विकासासाठी पालिकेने शासनाकडे काही निधीची मागणी केलेली आहे. तेथील अतिक्रमण हटवण्यास सांगितले आहे.
ही सर्व कामे केल्यानंतरच या गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यात यावा. या गावांचा आणि नवी मुंबईचा तसा भौगोलिक संबंध येत नाही. त्यांना एका बाजूने नवी मुंबईत यायचे झाले तर ठाणे महापालिकेतील काही प्रभाग ओलांडावे लागतात, दुसऱ्या बाजूने प्रवेश करायचा असेल तर पनवेल महापालिकेच्या हद्दीचा वापर करावा लागतो. तरीही शासनाने ही गावे नवी मुंबई पालिकेत समाविष्ट करण्याचा हट्ट धरला आहे. मात्र याबाबत जोर जबरदस्ती केली तर ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही नाईक यांनी यावेळी दिला.
महासभेपर्यंत थांबा
सध्या महासभा अस्तित्वात नाही. त्यामुळे मनमानी पद्धतीने निर्णय घेण्याचा सपाटा सुरू आहे. जर मी याविरोधात आवाज उठवला नसता तर नवी मुंबईकरांना मला तोंड दाखवता आले नसते. मुख्यमंत्र्यांनी पुत्राच्या फायद्यासाठी हा अध्यादेश लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काढला. मात्र आता खर्चाचा बोजा विनाकारण नवी मुंबई महापालिकेवर टाकू नये. या गावांचा निर्णय महासभा अस्तित्वात येईपर्यंत थांबवावा. नगरसेवक या प्रकरणावर चर्चा करतील त्यानंतरच या गावांचा महापालिकेत समावेश करण्यात यावा, असेही गणेश नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.