‘हाच तो काठीवाला दादा’, चिमुरड्यांनी नराधम अक्षय शिंदेला ओळखले; काही सेकंदांतच मुलींनी त्याच्याकडे बोट केले

आदर्श शाळेतील स्वच्छता कर्मचारी अक्षय शिंदे याने दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी त्याच्यावर दोन वेगवेगळे एफआयआर दाखल झाले आहेत. शनिवारी आरोपीची कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात ओळख परेड झाली. यावेळी दोन्ही चिमुरड्यांनी ‘हाच तो काठीवाला दादा’ म्हणत नराधम अक्षय शिंदेला ओळखले. त्यामुळे आता एसआयटी टीमने चार्जशीट दाखल करून हा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात वर्ग केला आहे. नराधमाची ओळख पटल्याने त्याच्या गळ्याभोवतीचा फास आता घट्ट आवळला जाणार आहे.

12 व 13 ऑगस्ट रोजी नराधम अक्षय शिंदे याने चार आणि सहा वर्षांच्या दोन मुलींचे लैंगिक शोषण केले होते. पालकांनी तक्रार करूनही गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी 11 तास लावले होते. याचा संताप म्हणून 20 ऑगस्ट रोजी बदलापूरमध्ये उत्स्फूर्तपणे नागरिक रस्त्यावर उतरले. आठ तास बदलापूर स्थानकात रेल रोको आंदोलन केले. या आंदोलनाची दखल कोर्टानेही घेतली.

राज्य शासनाला याप्रकरणी गंभीर दखल घेण्याचे निर्देश दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली. याशिवाय संस्थेचे पदाधिकारी आणि मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल केला. नराधम अक्षय शिंदेला 14 दिवस पोलीस कोठडी सुनावल्यानंतर आता तो न्यायालयीन कोठडीत तळोजा कारागृहात आहे. शासनाने याप्रकरणी एसआयटी नेमली असून बदलापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा एसआयटीकडे वर्ग झाला आहे. कल्याण न्यायालयात शनिवारी आरोपीची ओळख परेड झाली.

पाच पंचांसमोर रिफ्लेक्टेड काळ्या काचाच्या माध्यमातून अक्षय शिंदेची ओळख परेड झाली. पंच आणि पीडित मुली एकमेकांना ओळखत नव्हते. यावेळी पीडित दोन्ही चिमुरड्यांनी ‘हाच तो काठीवाला दादा’ म्हणत त्याच्याकडे बोट केले. त्यानेच असभ्य वर्तन केल्याचेही मुलींनी सांगितले. अचानक नराधम समोर आल्यानंतर मुलींनी त्याला काही सेकंदांतच ओळखले. त्यामुळे आता फास्ट ट्रॅक कोर्टात एसआयटी चार्जशीट दाखल करणार असून तातडीने यावर नियमित सुनावणी होणार आहे.

वामन म्हात्रेच्या अंतरिम जामिनावर आज सुनावणी

मीडियाशी काहीही बोलायचे नाही, साक्षीदारांवर प्रभाव टाकायचा असे स्पष्ट बजावत पत्रकार महिलेचा विनयभंग करणाऱ्या मिंधे गटाच्या वामन म्हात्रेला शुक्रवारी उच्च न्यायालयाने अटकेपासून तात्पुरता दिलासा दिला होता. उद्या सोमवारी त्याच्या अंतरिम जामिनावर सुनावणी होणार असून अटकेची टांगती तलवार कायम आहे. कल्याण सत्र न्यायालयाने गुरुवारी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताच अटक होण्याच्या भीतीपोटी म्हात्रेने शुक्रवारी उच्च न्यायालयात धाव घेतली व तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. त्यानुसार न्यायालयाने तक्रारदार महिलेचे म्हणणे ऐकण्यासाठी तिला नोटीस बजावली. त्यासाठी सोमवारी सुनावणी निश्चित करेपर्यंत म्हात्रेला अटकेपासून संरक्षण दिले. सोमवारी पुन्हा सुनावणी होणार असल्याने म्हात्रेला अटक होणार की जामीन मिळणार हे स्पष्ट होणार आहे.

म्हात्रेवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा!

बदलापूर येथील आदर्श शाळेतील चिमुरडींवरील अत्याचाराचे वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराशी अर्वाच्च भाषेत अरेरावी करणारे मिंधे गटाचे पदाधिकारी वामन म्हात्रे यांच्यावर अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र मिंधे गटाच्या दबावामुळे पोलीस अजूनही त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे. महिला पत्रकाराशी असभ्य वर्तन करूनही पोलिसांनी अजूनही त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कलम लावून कारवाई केलेली नाही. या निषेधार्थ अंबरनाथ पत्रकार संघटनेने आज तहसीलदार यांना निवेदन देऊन पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याप्रकरणी तहसीलदारांनी पोलिसांना निर्देश द्यावेत, अशी मागणीही पत्रकार संघटनेने केली. आंदोलनामध्ये पत्रकार युसूफभाई, सुनील अहिरे, अजय चिरीवेला, संजय राजगुरू, निसार खान, प्रफुल थोरात, पांडुरंग रानडे, तनवीर शेख, नवाज वणू, शत्रुघ्न उमाप, वामन उगले, परेश भानुशाली, अशोक नाईक, उस्मान शहा यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते