अनाठायी खर्चावरून टाकळीमिया ग्रामसभेत राडा

ग्रामपंचायत सदस्यांसाठी आसन व्यवस्थेवर केलेला खर्च व गावातील कामावर झालेल्या अनाठायी खर्चावरून ग्रामस्थांनी पदाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱयास धारेवर धरत चांगलाच राडा घातला. टाकळीमिया ग्रामपंचायतीची ग्रामसभा चांगलीच वादग्रस्त ठरली.

ग्रामसभेत ग्रामविकास अधिकाऱयाने मागील सभेचे इतिवृत्त वाचण्यास सुरुवात केली असता, नंदकुमार जुंदरे यांनी मागील ग्रामसभेला ग्रामस्थांना आमंत्रित केले नसल्याने ही सभा अनधिकृत होती. निव्वळ कागदावरच दाखविण्यात आलेल्या या ग्रामसभेत ग्रामस्थांच्या मागण्यांचे काय झाले? तसेच ग्रामपंचायतीमध्ये गरज नसताना सदस्यांच्या आसन व्यवस्थेवर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला, त्याचा खुलासा करण्याची मागणी केली. टाकळीमिया गावासाठी तब्बल 9 कोटी रुपये खर्च करून केलेली नवीन पाणी योजना वाया गेली आहे. मोरवाडीसाठी नवीन पाणी योजना केली. या योजनेच्या मंजुरीसाठी सोनवणे वस्ती व फसले वस्ती येथील लोकसंख्या दाखविण्यात आली. मात्र, सोनवणे व फसले वस्ती ग्रामस्थांनी हरकत घेतली असताना त्यांचा विरोध डावलून हे काम पूर्ण करण्यात आले. या कामाच्या चौकशीसाठी ग्रामपंचायत सदस्यांनी उपोषण केले होते. तसेच खळवाडी बालवाडीसाठी आलेला निधी व जागेच्या प्रश्नावरही ग्रामसभेत चर्चा झाली.

गावातील रस्त्यांच्या कामावर टाकलेल्या मुरुमाबाबत विचारणा केली असता, सरपंच गायकवाड यांनी मुरुम स्वखर्चाने टाकल्याची माहिती दिली. यावेळी वैयक्तिक खर्च करण्याची गरज नसल्याचे ग्रामस्थांनी खडसावले. पंचायत समितीतील अधिकाऱयाने दिलेल्या खुलाशावर ग्रामस्थांचे समाधान झाले नाही. त्यामुळे गटविकास अधिकाऱयास पाचारण करण्यात यावे, अशी मागणी करून त्यासाठी एक तासाची वेळ देण्यात आली. तासाभरानंतरही गटविकास अधिकारी ग्रामसभेकडे फिरकले नाहीत. अखेर भ्रमणध्वनीवरून गटविकास अधिकाऱयाशी संपर्क साधण्यात आला.