करवंटीच्या कवचातून साकारलेला बाप्पा, बांबूच्या विविध वस्तू, शाडूची माती, कागदाच्या नळ्या आणि कोल्ड्रिंक्सच्या टिनपासून बनवलेल्या वस्तू, टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेली रेल्वे इंजिनची हुबेहूब प्रतिकृती पाहण्याची संधी डोंबिवलीकरांना मिळणार आहे. निमित्त आहे ते सृजन कलादालनाच्या वतीने आयोजित केलेल्या आविष्कार कला प्रदर्शनाचे.
डोंबिवलीच्या रामनगर वाहतूक पोलीस शाखेसमोर उर्सेकरवाडीतल्या नवरे प्लाझामध्ये कायमस्वरूपी कलादालन उभारण्यात आले आहे. यात सृजन कलादालनाच्या वतीने आविष्कार कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 4 ते 6 सप्टेंबरदरम्यान सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 4 ते रात्री 9.30 या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. 4 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता शैलजा नवरे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष असून विविध कलाकारांच्या कलाविष्कारांचा अनुभव डोंबिवलीकर घेणार आहेत.
पर्यावरणपूरक कलाकृती
प्रदर्शनात रमेश दाते आणि आशीष नवरे यांच्या करवंटीच्या कवचातून साकारलेल्या गणेशमूर्ती, बांबूच्या कलात्मक वस्तू, संतोष काळे यांच्या काष्ठ कलाकृती तसेच अनंत कर्वे यांच्या शाडूची माती, कागदाच्या नळ्या आणि कोल्ड्रिंक्सचे टिन यापासून बनवलेल्या कलात्मक वस्तू, सुभाष राव यांनी टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या रेल्वे इंजिनाच्या हुबेहूब प्रतिकृती, शशिधर पांढारकर यांचे चित्ताकर्षक बुक पहल्डिंग आदी कलाकृतींचा समावेश आहे. या कलादालनात कलाविषयक विविध उपक्रम राबवण्याचा मानस या कलादालनाचे संकल्पक आशीष नवरे यांनी व्यक्त केला.