दुसऱ्या कसोटीतही लंकादहन, इंग्लंडने मालिकाही जिंकली; अ‍ॅटकिन्सन सामनावीर

इंग्लंडने उभारलेले 483 धावांचे प्रचंड आव्हान श्रीलंकेला पेलवलेच नाही. दिमुथ करुणारत्ने (55), दिनेश चंडीमल (58), कर्णधार धनंजया डि’सिल्व्हा (50) आणि मिलन रत्नायकेच्या (43) तडाखेबंद खेळानंतरही श्रीलंकेचा दुसरा डाव 292 धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि इंग्लंडने 190 धावांच्या दमदार विजयासह सलग दुसरी कसोटीही जिंकली आणि तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. आता तिसरा कसोटी सामना 6 सप्टेंबरपासून ओव्हलवर सुरू होईल.

पहिल्या मँचेस्टर कसोटीत श्रीलंकेने चांगलाच संघर्ष केला होता. कामिंदु मेंडिसच्या दुसऱ्या डावातील शतकामुळे लंकेने इंग्लंडसमोर विजयासाठी 205 धावांची आव्हानात्मक धावसंख्याही उभारली होती आणि इंग्लंडला विजयासाठी झुंजवलेसुद्धा होते. पण ज्यो रुटच्या 62 धावांच्या झुंजार खेळीने इंग्लंडला 5 विकेटनी विजय मिळवून दिला होता. या कसोटीतही रुट लंकेसमोर खणखणीत खेळला. दोन्ही डावांत शतकी खेळी केल्यामुळे इंग्लंडने 483 धावांचे जबरदस्त आव्हान ठेवले होते. शनिवारी 2 बाद 53 अशा स्थितीत असलेल्या पाहुण्यांसाठी विजय खूप दूर होता, पण लंकेने इंग्लंडला सहजासहजी विजय मिळू दिला नाही. पहिल्या डावात झंझावाती शतक ठोकणाऱ्या गस अॅटकिन्सनने चंडीमल, धनंजया, मेंडिस आणि रत्नायके यांचे महत्त्वाचे विकेट घेत लंकेचा डाव चौथ्याच दिवशी संपवला. त्याने 62 धावांत 5 विकेट टिपत ‘सामनावीर’ पुरस्कारही मिळवला. खिस व्होक्स आणि ओली स्टोन यांनीही प्रत्येकी दोन विकेट टिपल्या.