शिवद्रोही मिंधे सरकारला जोड्याने फोडून काढले! हुतात्मा स्मारक ते गेट वे ऑफ इंडिया; महाविकास आघाडीचे विराट आंदोलन

‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवराय’, ‘शिवद्रोह्यांना करू गपगार, माफी नाही हद्दपार,’ अशा घोषणांनी आज फोर्टचा परिसर दुमदुमला. मालवणच्या राजकोटवरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने मिंधे-भाजप सरकारविरुद्ध ‘जोडे मारा’ आंदोलन केले. महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ठणकावत या आंदोलनात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि शिवप्रेमी जनता सहभागी झाली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया असे विराट आंदोलन झाले.

सकाळी 10 वाजल्यापासूनच या आंदोलनासाठी हुतात्मा चौकात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि शिवप्रेमी जमले होते. हुतात्मा चौकाला अभिवादन केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया असा मोर्चा काढण्यात आला.

‘शिवद्रोह्यांनो लाज बाळगा’ असा संताप व्यक्त करत या आंदोलनात अनेक कार्यकर्ते आणि शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे घेऊन सहभागी झाले होते. भगवे झेंडे तसेच मिंधे सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या निषेधाचे फलकही अनेकांनी हाती घेतले होते. ‘खाऊन खाऊन खाणार कोण, भाजपशिवाय आहेच कोण’, ‘शिवद्रोह्यांना करू गपगार, माफी नाही हद्दपार’, ‘शिवद्रोह्यांना नाही थारा, गद्दारांना जोडे मारा’, ‘शिवद्रोही मिंधे-भाजपला जाब विचारायला आलोय, आमच्या दैवताचा केलेल्या अपमानाचा, महाराष्ट्राच्या दुखविलेल्या स्वाभिमानाचा,’ असे फलक या वेळी कार्यकर्त्यांनी झळकावले.

गेटवे ऑफ इंडियाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ाजवळ मोर्चा पोहोचताच गेटवेचा परिसर शिवरायांच्या गगनभेदी घोषणांनी दुमदुमून गेला. गेटवेजवळ मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. त्यानंतर प्रमुख नेत्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. शिवद्रोही सरकारला पुन्हा महाराष्ट्रात येऊ द्यायचे नाही, असा निर्धार व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना जोडे मारून आंदोलनाची सांगता झाली.

या आंदोलनात शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, दिवाकर रावते, चंद्रकांत खैरे, काँगेस नेते पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना नेते व खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, विनायक राऊत, विधिमंडळ गटनेते अजय चौधरी, शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू, राजन विचारे, उपनेते विनोद घोसाळकर, सचिन अहिर, शिवसेना सचिव, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार संजय पोतनीस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, आमदार अनिल देशमुख, राजेश टोपे, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राखी जाधव, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप, नसीम खान, अस्लम शेख यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते तसेच हजारो शिवप्रेमी जनता सहभागी झाली होती.

माफी मागून विषय संपणार नाही

सगळीकडे महागाई, बेरोजगार आणि भ्रष्टाचार… प्रचंड भ्रष्टाचारात लुप्त झालेले हे सरकार आहे. त्यांनी घर पह्डा, पक्ष फोडा एवढंच केलेय. बाकी काही काम केलेले नाही. अशा गलिच्छ सरकारचा मी जाहीर निषेध करते. आम्ही आज शांततेने आंदोलन करतोय. आज सुट्टीचा दिवस आहे. या भागातील कार्यालये बंद आहेत. मुंबईकरांना त्रास होऊ नये, त्यांची गैरसोय होऊ नये, हे सगळं लक्षात घेऊन आम्ही रविवारी आंदोलन करतोय. आपल्या दैवताचा अपमान या गलिच्छ भ्रष्ट सरकारने केला. माफी मागून विषय संपणार नाही. – सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय…

हा महाराष्ट्रातील अस्मितेचा विषय आहे. हा राजकारणाचा विषय नाही. उभ्या महाराष्ट्रातील मराठी जनांच्या मनाचा विषय आहे. पुतळा पडल्यानंतर महाराष्ट्र संतप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोर राजसिंहासनाधिष्ठाrत पुतळा उभारण्याची मागणी आम्ही सातत्याने करतोय, पण ते मागणी मान्य करत नाही. फक्त कायदे, नियम महाराष्ट्राला लावतायत. महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळ करत आहेत. – अरविंद सावंत, खासदार शिवसेना

माफी नाहीच

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यापासून आम्हाला कुणी अडवू शकत नाही. आम्ही संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राण त्याग करणाऱया शहीदांच्या स्मारकापासून आंदोलनाला सुरुवात करतोय. कारण या भ्रष्ट सरकारने फक्त पुतळा पाडला नाही, तर महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राची अस्मिता खाली पाडण्याचे काम केलेय. महाराष्ट्र त्यांना कधी माफ करणार नाही. – वर्षा गायकवाड, खासदार, मुंबई काँग्रेस अध्यक्ष

मालवणला का गेले नाहीत…

मोदीजींनी इथे त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर माफी मागितली. ते माफी मागण्यासाठी मालवणला का गेले नाहीत. तिथे माफी मागितली असती तर गोष्ट वेगळी होती. ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची, शाहू-फुले-आंबेडकर यांची आहे.
भाई जगताप, आमदार, काँग्रेस

आधी परवानगी नाकारली, नंतर बॅरिकेड्स हटवले

हुतात्मा चौक ते गेट वेपर्यंतच्या मार्गावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. महाविकास आघाडीच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी गेट वेजवळील मार्गावर बॅरिकेड्स उभारले होते. मात्र आज रविवार असल्याने पर्ह्ट भागातील कार्यालयांना सुट्टी आहे. असे असताना आंदोलनाला परवानगी का नाही, असा सवाल महाविकास आघाडीने केला. त्यानंतर हा मोर्चा अडवला जाणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. लावलेले बॅरिकेड्सही हटवण्यात आल्यानंतर मोर्चा गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाला.

आजपासून राज्यभर सरकारला जोडे मारणार

मालवणातील शिवपुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज मुंबईत केलेल्या यशस्वी आंदोलनानंतर उद्यापासून राज्यभरात सरकारला जोडे मारा आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हा आणि तालुका स्तरावर हे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

योद्धे अनवाणी उतरले आंदोलनात

महाविकास आघाडीचे प्रमुख नेते हुतात्मा चौक ते गेट वेपर्यंतच्या मोर्चात पायी चालत सहभागी झाले होते. हुतात्मा स्मारक येथे अभिवादन केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस खासदार छत्रपती शाहू महाराज हे योद्धे हातात हात घालून मोर्चामध्ये चालत होते. प्रकृतीच्या कारणास्तव पायाला पट्टय़ा बांधलेल्या असतानाही शरद पवार मोर्चामध्ये अनवाणी चालले. या दोन ज्येष्ठ नेत्यांचा उत्साह पाहून तरुण कार्यकर्त्यांनाही हुरूप आला होता.

महाराजांचा पुतळा कोसळणे हा भ्रष्टाचाराचा नमुना – शरद पवार

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे हा भ्रष्टाचाराचा नमुना आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. शिवरायांचा पुतळा वाऱयामुळे पडला असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान धक्कादायक आहे. गेट वे ऑफ इंडियासमोरचा पुतळा अनेक वर्षांपासून आहे. राज्याच्या किनारपट्टीवरील अनेक भागांत असे पुतळे आजही वादळी वारे सोसत भक्कमपणे उभे आहेत, असे शरद पवार म्हणाले. महाराजांचा पुतळा कोसळल्याने देशातील शिवप्रेमींचा अपमान झाला आहे. ज्यांच्यामुळे हा पुतळा पडला त्यांचा निषेध करण्यासाठी आजचे आंदोलन होते, असे ते म्हणाले.

हे पाप अक्षम्य, माफीवीरांना घरचा रस्ता दाखवा – पटोले

विधानसभा निवडणुकीचा काळ असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागितली, पण हे पाप अक्षम्य आहे. या चुकीला माफी नाही, माफीवीरांना आता घरचा रस्ता दाखवा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

दोषींवर कारवाई करून महाराजांचा मान राखा – शाहू महाराज

महाराष्ट्रात आणि देशात छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखलाच गेला पाहिजे असे सांगतानाच, पुतळा कोसळल्याप्रकरणी जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करून महाराजांचा मान राखा, असे खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणाले.