फडणवीस व त्यांच्या मिंधे सरकारने शिवरायांचा सन्मान तर केला नाहीच, उलट शिवरायांचा अवमान होत असताना आपली तोंडेही शिवून ठेवली. एकंदरीत छत्रपती शिवराय अवमान प्रकरणात भाजप व त्यांच्या बगलबच्च्यांचे ढोंग उघडे पडले. त्यांना स्वतःवर गाढव होण्याची वेळ आली आणि त्यांचे ब्रह्मचर्यही निघून गेले. शिवप्रेमींवर कायद्याचा बडगा उगारणारे मिंधे सरकार राज्यात आहे. हे शिवरायांचे राज्य म्हणता येणार नाही. शिवरायांनी महाराष्ट्राला शूर आणि मर्द बनवले. फडणवीस–मिंधे वगैरे लोकांनी महाराष्ट्राला लाचार, बेइमान, नामर्द बनविण्याचे ठरवले आहे. शिवरायांचा महाराष्ट्र हा असा नाही. गाढवांनी ब्रह्मचर्यही घालवल्यावर दुसरे काय घडायचे!
एक ब्रह्मचारी गाढवाशी झोंबता
हाणुनिया लाथा पळाले ते।
गाढवही गेले, ब्रह्मचर्य गेले
झाले तोंड काळे, जगामाजी।।
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी एका ब्रह्मचाऱ्यांच्या कर्तृत्वाची कथा अत्यंत विडंबनात्मक पद्धतीने सांगितली आहे. हा अभंग रचताना तुकाराम महाराजांना मोदी, फडणवीस, मिंधे, केसरकर, शेलार, अजितदादा अशी भाजपची टोळी दिसत होती काय ते सांगता येणार नाही, पण हेच वर्णन या मंडळींनाही तंतोतंत लागू पडले आहे. महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळून पडताच जनमत तापले आहे व जनतेने सरकारविरुद्ध आंदोलन सुरू केले. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियासमोर भ्रष्ट आणि शिवद्रोही सरकारला जोडे मारण्याचा कार्यक्रम झाला. लोकशाहीत अशी आंदोलने होणारच. भारतीय जनता पक्षानेही ती केली आहेत, पण आज त्यांचे सरकार राज्यात असताना त्यांना लोकशाही मार्गाने होणारी ही आंदोलने नकोशी झाली. ‘जोडे मारा’ आंदोलनात पोलिसांनी अडथळे आणले व मूर्खांचा कारभार असा की, छत्रपती शिवरायांच्या सन्मानासाठी विरोधकांनी केलेल्या आंदोलनास विरोध किंवा प्रतिवाद म्हणून भाजपने एक फुटकळ आंदोलन केले. म्हणजे त्यांचे आंदोलन हे शिवरायांच्या सन्मानाविरोधात झाले. विरोधासाठी विरोध करताना त्यांनी ते शिवरायांच्या मान-सन्मानाच्या विरोधात असल्याचे दाखवून दिले. तुकोबांच्या अभंगातील ब्रह्मचाऱ्यांने गाढवही गमावले होते. भाजपने स्वतःचे गाढवपण सिद्ध करून
आपले उरले-सुरले
ब्रह्मचर्य गमावले आहे. फडणवीस वगैरे लोकांचे म्हणणे असे की, ‘मालवणमधील राजकोटवरील शिवरायांचा पुतळा कोसळून छिन्नविच्छिन्न झाला. त्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी माफी मागितली आहे. मग विरोधक आंदोलन का करीत आहेत? विरोधक राजकारण करीत आहेत.’ फडणवीसांनी राज्याच्या संस्कृतीचे गजकर्ण केल्यामुळे शिवरायांच्या सन्मानासाठी कुणी स्वच्छ राजकारण करीत असेल तर भाजपच्या सर्वांगास खाज का सुटावी? तुम्ही तुमचे खाजवत बसा. महाराष्ट्राला ज्ञान देण्याची गरज नाही. तुमचे शिवप्रेम किती ढोंगी हे वारंवार उघड झाले आहे. शिवरायांनी स्वराज्य म्हणजे महाराष्ट्र निर्माण केला व शिवरायांच्या प्रेरणेमुळेच आजचा महाराष्ट्र अखंड आहे. हा महाराष्ट्र विखंडित करावा व त्यातून विदर्भ वेगळा करावा हे भाजपचे राष्ट्रीय धोरण आहे. स्वतंत्र विदर्भाचा लचका तुटत नाही तोपर्यंत लग्नाच्या बोहल्यावर चढणार नाही अशी प्रतिज्ञा ज्या फडणवीसांनी केली ते शिवरायभक्त कसे मानायचे? महाराष्ट्राचे माजी भाजपाई राज्यपाल कोश्यारी यांनी जाहीर कार्यक्रमात छत्रपतींचा अवमान केला होता तेव्हा त्यांची बाजू घेऊन उभे राहिलेल्या मिंधे-फडणवीसांना शिवभक्त मानणे म्हणजे औरंगजेबास महाराष्ट्रप्रेमी मानण्यासारखेच आहे. आता तर शिवरायांचा भव्य पुतळाच कोसळून पडला व त्याविरोधात संताप व्यक्त करणाऱ्यां शिवप्रेमींना रोखले जात आहे. मालवणात भाजपचे गुंड शिवप्रेमींच्या अंगावर चालून गेले. या गुंडांनी पोलिसांना शिव्या घातल्या. फडणवीस हे अरबी समुद्रात शिवरायांच्या
भव्य स्मारकाची घोषणा
करून बसले आहेत. काही वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींच्या हस्ते समुद्रात या स्मारकाचे जलपूजनही झाले, पण या स्मारकाचे काम अद्याप एक इंचही पुढे सरकलेले नाही. या होऊ न शकलेल्या शिवरायांच्या स्मारकाचे राजकारण या मंडळींनी केलेच. ही काय शिवभक्ती झाली! समुद्रातले स्मारक करता येत नसेल तर राजभवनाच्या पाठीमागच्या मोकळ्या जागेत शिवरायांचे भव्य स्मारक नक्कीच उभे करता येईल. महाराष्ट्राच्या मुळावर येणारे हे राजभवन व त्यांना पोसणारे पांढरे हत्ती हवेतच कशाला? शिवस्मारकासाठी आज तरी ती जागा योग्य आहे. मालवणचे पाप थोडे धुऊन काढायचे असेल तर राजभवनामागच्या समुद्रावर शिवस्मारकाची पायाभरणी लगेच व्हायला हवी. अर्थात ही मंडळी एकवेळ हा राजभवनाचा भूखंड अदानी किंवा लोढांना देतील, पण शिवस्मारकासाठी गुंजभर जमीनही ते देणार नाहीत आणि हे म्हणे शिवरायांचे भक्त! फडणवीस व त्यांच्या मिंधे सरकारने शिवरायांचा सन्मान तर केला नाहीच, उलट शिवरायांचा अवमान होत असताना आपली तोंडेही शिवून ठेवली. एकंदरीत छत्रपती शिवराय अवमान प्रकरणात भाजप व त्यांच्या बगलबच्च्यांचे ढोंग उघडे पडले. त्यांना स्वतःवर गाढव होण्याची वेळ आली आणि त्यांचे ब्रह्मचर्यही निघून गेले. शिवप्रेमींवर कायद्याचा बडगा उगारणारे मिंधे सरकार राज्यात आहे. हे शिवरायांचे राज्य म्हणता येणार नाही. शिवरायांनी महाराष्ट्राला शूर आणि मर्द बनवले. फडणवीस-मिंधे वगैरे लोकांनी महाराष्ट्राला लाचार, बेइमान, नामर्द बनविण्याचे ठरवले आहे. शिवरायांचा महाराष्ट्र हा असा नाही. गाढवांनी ब्रह्मचर्यही घालवल्यावर दुसरे काय घडायचे!