दापोली येथील हर्णे येथील वाहतुककोंडीने प्रवासी त्रस्त

हर्णे बाजारपेठेतील मार्गावर होत असलेल्या दररोजच्या वाहतूककोंडीच्या समस्येने हर्णे येथील रहिवाशांसह या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक हैरान झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग अणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे हर्णे येथील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याऐवजी ती अधिक जटील होत चालली आहे. याचा परिणाम हा येथील व्यापार उद्दिमावर तर होत आहेच शिवाय या मार्गावरून प्रवास करणा-या स्थानिक रहिवाशांसह पर्यटकांनाही वाहतूककोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दापोली तालुक्यातील हर्णे हे तालुक्यातील सर्वाधिक लोकवस्तीचे गाव आहे. या गावांतून दापोलीकडे तसेच हर्णे मार्गे पाजपंढरी, आंजर्ले, केळशी, मांदिवलीकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरच हर्णे येथे मच्छीमारी बंदर तसेच पाण्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्यासह आणखीन काही प्रेक्षणीय स्थळे आणि किल्ले आहेत. शिवाय हर्णे ही एक व्यापारी बाजारपेठ असल्याने या मार्गावर नेहमीच प्रवाशांसह व्यापारी वाहनांची वर्दळ असते. अशा या मार्गावरील  हर्णे बाजारपेठेत असलेला अरुंद रस्ता आणि त्यामुळे या मार्गावर होणारी वाहतूककोंडीची समस्या लक्षात घेता समुद्रकिनाऱ्यालगत पर्यायी मार्ग काढला तर वाहतूककोंडीची समस्या निकाली निघेल.
मात्र येथील वाहतुककोंडीची समस्या सोडविण्यासाठी बांधकाम विभाग काही प्रयत्न करताना दिसत नाही. लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्यामुळे वाहतूककोंडीच्या समस्येने दिवसेंदिवस उग्ररूप धारण केले आहे. अनेकदा येथील मार्गावर  एस.टी. बस आणि खासगी वाहनांच्या कोंडीने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगाच रांगा लागतात त्यामुळे कित्येकांना रस्त्यातच कित्येक वेळ एकाच जागेवर रस्त्यात तिष्ठत थांबून राहावे लागते.
अशा या नेहमीच्याच  होणा-या वाहतुक समस्येच्या वाहतूककोंडीने एखाद्याला आपल्या महत्त्वाच्या कामासाठी या मार्गावरील गावातील प्रवाशांना वेळेत पोहोचणे अथवा आजारी रुग्णासाठी रुग्णवाहिकेला मार्ग काढून देणे अरूंद रस्ता त्यातच झालेल्या वाहतुककोंडीने शक्य होत नाही. परिणामी त्याला वेळेत उपचार मिळत नाहीत.  अशा या समस्या महत्त्वाच्या असून या समस्या निकाली काढण्याऐवजी त्या चिघळत ठेवणे हा विकास नव्हे. अशा प्रकारच्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाविरोधातील नापसंतीच्या प्रतिक्रिया वाहतूककोंडीत अडकलेल्यांकडून ऐकायला मिळतात.