जत तालुक्याच्या पूर्व भागात आणि आटपाडी तालुक्याच्या काही भागांमध्ये रिमझिम पाऊस वगळता, अद्यापि धुवाँधार पाऊस झालेला नाही. त्यामुळे पाणीटंचाई हटण्याचे काही नाव घेईना. परिणामी, आजही 20 गावांसह 125 वाड्या-वस्त्यांवर 26 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर, दुसरीकडे छोटे-मोठे पाझर तलाव, सिमेंट बंधारे अद्यापि कोरडेठाक असल्याचे वास्तव चित्र पाहावयास मिळत आहे.
पावसाचे तीन महिने संपले तरी अद्यापि जत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये धुवाँधार पाऊस झालेला नाही. त्यामुळे पाझर तलाव, सिमेंट बंधारे, साखळी बंधारे कोरडेठाक आहेत. रिमझिम पावसामुळे खरिपाची पिके चांगली आली आहेत. जर धुवाँधार पाऊस झाला नाही, तर लवकरच भीषण पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होतोय की काय, अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. जत तालुक्यातील 17 गावे आणि 96 वाड्या-वस्त्यांवर 24 टँकरद्वारे आजही पाणीपुरवठा केला जात आहे.
आटपाडी तालुक्यातील तीन गावे आणि 29 वाड्यांना दोन टँकर्सद्वारे पाणीपुरवठा होत आहे. जत, आटपाडी तालुक्यांनाच दुष्काळ हटण्यासाठी धुवाँधार पावसाची गरज आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने 20 गावांसह 125 वाड्या-वस्त्यांचे टँकर बंद होतील. यापुढे पाऊस झाला नाही, तर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवल्याशिवाय राहणार नाही.
या गावांत आजही टँकरद्वारे पाणीपुरवठा
जत तालुक्यातील सिंदूर, पांढरेवाडी, बसर्गी, सोन्याळ, गुगवाड, संख, उमराणी, मुचंडी, लमाणतांडा (दरीबडची), केरेवाडी (कोणत्याणबोबलाद), गोंधळेवाडी, खोजनवाडी, कुलाळवाडी, बेवनूर, उमदी, गुड्डापूर, उंटवाडी, आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी, उंबरगाव, विभूतवाडी, दिघंची (वाड्यांसाठी) येथे आजही 26 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.