Mumbai News – मोटरसायकल वीजेच्या खांबाला धडकल्याने भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मोटारसायकल वीजेच्या खांबाला धडकल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री मुंबईतील गोरेगावमध्ये घडली. राधेश्याम दवंडे, विवेक राजभर आणि रितेश साळवे अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आरे पोलिसांनी अपघाताची मृत्यूची नोंद केली आहे.

आरे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तिघेही पवईहून गोरेगावच्या दिशेने चालले होते. आरे पिकनिक पॉईंटजवळ एका वळणावर त्यांची मोटारसायकल वीजेच्या खांबाला धडकली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र राधेशाम दवंडे आणि विवेक राजभर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर साळवे याच्या छातीत दुखू लागल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

आरे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. पोलीस रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. तिघेही दारुच्या नशेत असल्याचा पोलिसांना संशय आहे. तिन्ही मृतांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून चाचणीचा अहवाल आल्यानंतरच त्यांनी दारू प्यायली होती की नाही हे समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.