आंध्र प्रदेशातील एका कॉलेजमध्ये गर्ल्स हॉस्टेलच्या वॉशरुममध्ये छुपा कॅमेरा सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली. यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन करत दोषींवर कारवाईची मागणी केली. याचदरम्यान पोलिसांनी एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. या निवेदनात वॉशरुममध्ये कोणताही छुपा कॅमेरा नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे मुलींच्या हॉस्टेलमधील शौचालयात छुपा कॅमेरा नाही. कॅमेरा लावल्याते कोणतेही पुरावेही मिळाले नाहीत. याबाबत चिंता करू नये असे पोलिसांनी हॉस्टेलमधील विद्यार्थिनींना सांगितले.
मुलींच्या वसतिगृहातील वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा सापडल्याच्या आरोपाची चौकशी करण्यात येत आहे. तपासासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. विशेष तपास अधिकारी म्हणून एका निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे आणि पाच सदस्यीय पथक या प्रकरणाचा तांत्रिक तपासही करत आहे.
पोलिसांनी विद्यार्थी आणि महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संशयास्पद लॅपटॉप, मोबाईल फोन तसेच इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सही तपासले. कोणताही कथित व्हिडिओ प्रसारित झाला आहे का याबाबतही तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक गंगाधर राव यांनी सांगितले.