मल्याळम चित्रपटसृष्टीतील महिलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना उघडकीस येताच मल्याळम इंडस्ट्री बॉडी असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्ट (AMMA) चे अध्यक्ष मोहनलाल यांनी पदाचा राजीनामा दिला. मोहनलाल यांच्यासह कमिटीच्या सर्वच सदस्यांनी राजीनामा दिला. राजीनामा सत्रानंतर मोहलनाल यांच्यावर टिकेची झोड उठली. अखेर मोहनलाल यांनी राजीनाम्याबाबत मौन सोडले आहे. राजीनाम्यानंतर मोहनलाल यांनी पहिल्यांदाच मीडियाशी संवाद साधला.
ही अतिशय मेहनती इंडस्ट्री आहे. सर्व प्रकरणांची चौकशी सुरू आहे. सर्व जबाब जनतेसमोर आले आहेत. कृपया AMMA ला लक्ष्य करू नका. मल्याळम इंडस्ट्री नष्ट करू नका, असे आवाहन मोहनलाल यांनी केले.
मी परिस्थितीपासून पळत नाही. माझ्या पत्नीची शस्त्रक्रिया झाली आहे. शिवाय माझ्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमुळे मी फार काही बोलू शकत नाही. गेली दोन टर्म मी AMMA चा अध्यक्ष होतो. समिती सदस्यांच्या राजीनाम्याला संपूर्ण मल्याळम इंडस्ट्री जबाबदार आहे. AMMA प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. हेमा समितीकडे माझा जबाब दिला आहे. त्यांनी प्रश्न विचारले आणि मला जे माहित होते ते मी सर्व त्यांना सांगितले, असे मोहनलाल म्हणाले.
अनेक लोक या इंडस्ट्रीशी निगडीत आहेत. प्रत्येकाला दोष देता येणार नाही. याला जो कोणी जबाबदार असेल त्याला शिक्षा होईल. तपास सुरू आहे. आम्ही प्रत्येकासाठी कायदा बदलू शकत नाही. ज्यांनी गुन्हे केले आहेत त्यांना शिक्षा होईल, असेही मोहलनाल यांनी नमूद केले.
AMMA च्या अनेक सदस्यांवर लैंगिक शोषणाचे आरोपही झाले होते. हेमा समितीच्या अहवालानंतर, नियामक मंडळाच्या काही सदस्यांवर लावण्यात आलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांची नैतिक जबाबदारी स्वीकारून AMMA च्या संपूर्ण नियामक मंडळाने राजीनामा दिला आहे, असे पुढे मोहनलाल यांनी स्पष्ट केले.