व्यक्तिगत भ्रष्टाचार प्रत्येकाने टाळला तरच समाज आणि देश सक्षम होईल! – तुकाराम मुंढे

घरच्यांना कॉलेजमध्ये लेक्चरला चाललो आहे असे सांगून पिक्चरला जाणे, एखादे लेक्चर प्राध्यापक चांगले शिकवत नाही म्हणून बुडवणे हे देखील व्यक्तिगत भ्रष्टाचाराचे प्रकार आहेत. आपल्या आयुष्यात प्रत्येकाने असा व्यक्तिगत भ्रष्टाचार करणे टाळले तरच देश आणि समाज सक्षम होईल असे वक्तव्य भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ म्हणून प्रसिद्ध असलेले आयएएस अधिकारी व मुंबईचे कामगार आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या छत्रपती शाहू सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात त्यांनी हे प्रतिपादन केले. यशवंतराव चव्हाण व्यासपीठ आणि नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण व्यासपीठाच्या 24 व्या वर्षी पहिल्या पुष्पमालेतील व्याख्यानामध्ये प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, भ्रष्टाचार संपवणे ही पुन्हा एका व्यक्तीची किंवा सरकारची जबाबदारी नसून ती सामूहिकपणे सर्वांची आहे. आपल्याला जर ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे असेल तर आपण स्वतः न जाता एजंट नेमतो आणि तिथेच भ्रष्टाचाराला खतपाणी घालतो. बांगलादेश, श्रीलंकेची उदाहरणे पहा. त्यांचे काय झाले? आपला समाज जर सुदृढ व्हायचा असेल तर प्रत्येकाने गांभीर्याने आणि जबाबदारीने वागले पाहिजे.

आपण जो पेशा स्वीकारला त्यातील काम आपण प्रामणिकपणे आणि अधिक चांगल्या पद्धतीने कसे करता येईल हे पाहिले पाहिजे. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. आपण कोणतेही काम करत असतो तेव्हा आपल्याला समाज बघतो आहे. समाजाचे आपल्याकडे लक्ष आहे याची जाणीव आपल्याला वारंवार झाली पाहिजे, असे तुकाराम मुंढे म्हणाले.

विद्यार्थी दशेत प्रत्येक जण आयपीएस, आयएएस होण्याचे स्वप्न उराशी बाळगतो पण ते चुकीचे आहे दहा लाख विद्यार्थी या स्पर्धेला बसतात आणि त्यातील शंभरच आयएएस होतात म्हणजे पॉईंट झिरो झिरो झिरो वन असे प्रमाण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पहिल्या एक-दोन अटेम्प्ट नंतर विषय सोडावा व प्लॅन बी तयार ठेवावा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.