आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असताना निवडणूक आयोगाकडून कधीही निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल 2 लाख मतदारांची वाढ झाली आहे. यामध्ये 18 ते 19 वयोगटातील 26 हजार 365 नवे मतदार यंदा पहिल्यांदाच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी 18 विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज प्राप्त झाले होते. यामध्ये स्थलांतरित, पत्ते बदल तसेच मतदार यादीतून नाव वगळणे, तपशील दुरुस्तीसाठीदेखील मतदारांनी अर्ज केले होते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीमध्ये एकही मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये म्हणून विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.
नोंदणीची प्रक्रिया निरंतर सुरू
विधानसभा निवडणुका जाहीर होईपर्यंत मतदार नोंदणीची प्रक्रिया ही निरंतर सुरू राहणार आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना मतदान प्रक्रियेत भाग घ्यायचा असल्यास त्यांनी आवर्जून मतदार नोंदणी करावी असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी केले आहे.
यादीमध्ये नाव असल्याची खात्री करा
मतदारांमध्ये 18 ते 19 वयोगटातील एकूण 26 हजार 365 नवमतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. मतदारांनी आजच आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याची खात्री करावी, नाव नसल्यास संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.
हक्क बजावण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद
जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघाच्या यादीमध्ये 37 लाख 48 हजार 816 पुरुष, 32 लाख 57 हजार 403 महिला व 1 हजार 387 इतर असे मिळून एकूण 70 लाख 7 हजार 606 इतके मतदार आहेत, तर 6 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये एकूण 68 लाख 1 हजार 244 मतदार होते. दरम्यान, मतदार नोंदणी कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 91 हजार 765 पुरुष, 1 लाख 14 हजार 544 महिला व 53 इतर असे एकूण 2 लाख 6 हजार 362 मतदारांनी आपली नावे नोंदवली आहेत.