परीक्षण- गायीच्या राजकारणाचे विश्लेषण

>> आशीष कोरडे

दोन दिवसांपूर्वी भाजपच्या एका नेत्याने वायनाड केरळ येथे झालेली भूस्खलनाची आपत्ती ही तेथे गायींना मारण्यात आल्याचा परिणाम असल्याचे वादग्रस्त विधान केले. मुळात या दोन गोष्टींचा दुरान्वयेही संबंध नाही. मात्र देशात गाय हा विषय खूप संवेदनशील असल्याने त्याची चर्चा करायला किंवा त्यावर भाष्य करायला फारसं कोणी पुढे येत नाही. अशावेळी पत्रकार श्रुति गणपत्ये यांचे ‘गाईच्या नावाने चांगभलं’ हे अलीकडेच प्रकाशित झालेलं पुस्तक खूप महत्त्वाची माहिती समोर आणतं. आर्यपूर्व काळातला पूर्वजांना इतिहास, त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी, गोमांसाचे सेवन, त्यानंतर आलेले आर्य आणि त्या काळात गायीचे वाढलेले महत्त्व, स्वातंत्र्यपूर्व काळात 19 व्या शतकाच्या शेवटी गोहत्या बंदीचं सुरू झालेलं राजकारण, त्याचा हिंदू अतिउजव्या शक्तींनी घेतलेला फायदा आणि मुस्लिमांना केलेलं लक्ष्य असा इतिहासाचा मोजका पण नेमका भाग येतो. गाय राजकीय विषय बनण्याचा सविस्तर प्रवास यामध्ये दिलेला आहे.

पण लेखिका केवळ इतिहासामध्ये न अडकता 2014 नंतर देशभरामध्ये गोहत्या, गोमांस या नावाने गोरक्षकांनी घातलेला धुमाकूळ, झुंडबळी आणि त्याचा इथल्या समाजावर झालेला परिणाम याचाही परामर्श घेते. मुळात देशामध्ये निर्माण केलेलं वातावरण की, प्रत्येक मुस्लिम, दलित, आदिवासी हा गोहत्या करतो, गायीला कापून खातो हे कसं खोटं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न लेखिकेने वर्तमानातल्या घटनांचं विश्लेषण करून दिला आहे. भाजपचं सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी गोहत्येसंबंधीचे कायदे अतिकडक केले. अगदी काही राज्यांमध्ये जन्मठेप आणि राष्ट्रीय सुरक्षा भंग केल्याबद्दल दिल्या जाणाऱया शिक्षा याचाही समावेश केला. मुळात कायदे कडक करताना तशी परिस्थिती असावी लागते. मात्र केवळ खोटय़ा प्रचाराच्या माध्यमातून लोकांच्या मनावर देशभर गोहत्या होत असल्याचं बिंबवण्यात आलं. पण जेव्हा हीच माहिती लेखिकेने माहिती अधिकाराच्या अंतर्गत 90 अर्ज करून 11 राज्यांमधून मागवली तेव्हा वेगळंच सत्य समोर आलं. जेवढी माहिती लेखिकेला मिळाली त्यानुसार, भाजप सरकार सत्तेत आल्यावर या हिंसाचाराच्या घटना वाढल्याचं समोर आलं. तसेच पकडलेलं मांस हे गोमांस आहे की नाही, याचा तपास घेणारी यंत्रणाच अनेक राज्यांमध्ये नाही. ते मांस तपासलं जातं की नाही याचीही नोंद राज्यांकडे नाही. त्यामुळे नक्की कशाच्या आधारे गोमांस पकडल्याची ओरड होते आणि मोठे आकडे छापून येतात यावर प्रश्नचिन्हं उपस्थित होतं.

या एकूणच हिंसाचाराचा परिणाम असा झाला की, शेतकऱयाची अर्थव्यवस्था, चामडं व्यवसाय, मांस निर्यात या सगळ्यांवरच परिणाम झाला. महाराष्ट्रासारख्या शेती प्रधान राज्यामध्ये गाय-बैलांच्या किंमती 25-30 टक्क्यांनी उतरल्या. एक पीक घेणाऱया शेतकऱयाला उरलेल्या काळात बैल विकून थोडी रोख रक्कम घरखर्च, शिक्षण, आरोग्य, लग्नं यासाठी हाती येत होती. ती मिळणं बंद झालं. चामडं व्यवसाय महाराष्ट्रातून कमी होऊन चेन्नई किंवा बांग्लादेश, चीन येथे गेला. सरकारी आकडेवारीच 2014 नंतर चामडे व्यापाराची निर्यात घसरल्याची कबुली देते. गंमत म्हणजे ज्या उत्तर प्रदेशमध्ये गोमांसावरून राजकारण पेटलं आहे तिथेच म्हणशीचं मांस निर्यात करणाऱया सर्वात जास्त कंपन्या आहेत.

गेल्या 10 वर्षांच्या काळात, गायीच्या नावाने केलेल्या राजकारणात, हिंसाचारात शेकडो लोकांचे बळी गेले आहेत आणि हिंदू-मुस्लिम दरी अधिकच खोल झाली आहे. या हिंसाचाराला अंत नाही. त्यामुळे या विषयाची वारंवार चर्चा झाली पाहिजे आणि खरी माहिती लोकांसमोर आली पाहिजे म्हणून हे पुस्तक एक प्रामाणिक आणि धाडसी प्रयत्न आहे.

गाईच्या नावानं चांगभलं
मूळ इंग्रजी पुस्तक ः व्हू विल बेल द काऊ?
लेखिका ः श्रुति गणपत्ये
प्रकाशक ः लोकवाड्.मय गृह