महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील पुतळा भाजपाच्या भ्रष्ट कारभारामुळे कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखेर माफी मागावी लागली. महाराष्ट्राची अस्मिता व स्वाभिमानासाठी आवाज उठवणाऱया तमाम शिवप्रेमींचा हा विजय आहे. छत्रपतींचा महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर कधी झुकला नाही व झुकणारही नाही हे आज पुन्हा अधोरेखित झाल्याचा घणाघात करीत आज काँग्रेसने चेंबूरमध्ये जोरदार आंदोलन केले. याप्रकरणी संबंधित जबाबदार बडय़ा धेंडांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली.
नसीम खान घरीच स्थानबद्ध
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निषेध आंदोलन करण्यासाठी जाणाऱया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी घरीच स्थानबद्ध करण्यात आले. याप्रकरणी विरोधकांनी मिंधे सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.