विनयभंगाचा तपास करताना एका पोलीस अधिकाऱ्याने चूक केल्यास संपूर्ण मुंबई पोलीस महिलांवरील अत्याचाराचा तपास गांभीर्याने करत नाहीत असा अर्थ काढता येणार नाही. महिलांवरील अत्याचाराचा तपास मुंबई पोलीस गांभीर्यानेच करतात, असे प्रतिज्ञापत्र खुद्द पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी उच्च न्यायालयात सादर केले आहे.
प्रत्येक गुह्याचा तपास गांभीर्याने केला जातो. त्यातही महिलांवरील अत्याचाराच्या तपासाला प्राधान्य दिले जाते. मुंबई पोलिसांचा प्रमुख या नात्याने प्रत्येक तपास योग्य प्रकार केला जात आहे की नाही यावर लक्ष ठेवण्याची नैतिक जबाबदारी माझी आहे, असे आयुक्त यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
आरोपीने पीडितेचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करून विनयभंग केला. या प्रकरणात पीडितेचे कपडे जप्त करण्यात आले नाहीत. त्याची गंभीर दखल घेत याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्या. अजय गडकरी व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने दिले होते. या आदेशानुसार हे प्रतिज्ञापत्र सादर झाले आहे.
तपासात त्रुटी राहिल्याची कबुली
मुलीचे कपडे फाडण्याचा प्रयत्न झाला. याचा तपास करणारा तपास अधिकारी अपयशी ठरला. पीडित मुलीचे कपडे जप्त करणे व त्याचा पंचनामा होणे आवश्यक होते. आतापर्यंत या तपासाचा फायदा आरोपीला झाला असल्याची कबुली प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे.
पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश
या घटनेचे आरोपपत्र दाखल झाले आहे. मात्र पीडित मुलीचे कपडे जप्त करून पंचनामा झाल्यानंतर त्याचे पुरवणी आरोपपत्र दाखल करा, असे आदेश संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
पोलिसाची होणार चौकशी
पीडितेचे कपडे जप्त न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्याकडून केली जाईल. चौकशीत दोषी आढळल्यास या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी हमी पोलीस आयुक्तांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे.