दीड हजार गणेशोत्सव मंडळे परवानगीसाठी ‘वेटिंगवर’! पालिकेच्या नियोजनाचा फज्जा…

गणेशोत्सव अवघ्या आठवडय़ावर आल्यामुळे मंडळांमध्ये उत्सवाच्या तयारीची प्रचंड धावपळ सुरू असताना पालिकेच्या नियोजनाचा फज्जा उडाल्यामुळे मुंबईतील दीड हजारांवर मंडळे अजूनही परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. पालिकेकडे आतापर्यंत परवानगीसाठी 2718 मंडळांनी अर्ज केले असून यातील फक्त 1364 मंडळांनाच परवानग्या देण्यात आल्या आहेत. तर 206 मंडळांचे अर्ज विविध कारणांमुळे नामंजूर करण्यात आले आहेत. तर 1148 अर्जांबाबत कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांकडून पालिकेच्या काराभाराबाबत प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

मुंबईत सुमारे बारा हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. तर सवा दोन लाख घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. बारा हजार सार्वजनिक मंडळांपैकी सुमारे तीन हजार मंडळे रस्त्याच्या बाजूला पिंवा मोकळय़ा जागेत मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करतात. यासाठी पालिकेकडून मंडळांना रीतसर परवानगी घ्यावी लागते. यासाठी पालिकेनेही 6 ऑगस्टपासून ऑनलाइन आणि वॉर्ड कार्यालयात ऑफलाइन अर्ज सादर करून परवानगी मिळण्याची कार्यवाही सुरू केली आहे. यामध्ये काही विभागात ही प्रक्रिया उशिरा सुरू झाली. गणेशोत्सव 7 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. गणेशोत्सवापूर्वी श्री गणेशाचे मंडपात 11 ऑगस्टपासून आगमनाला सुरुवातही झाली आहे. त्यामुळे अनेक मंडळांना अद्याप परवानगी मिळाली नसल्याने ही मंडळे अडचणीत सापडली आहेत.

अशी झाली कार्यवाही

n पालिकेकडे या वर्षी मंडप परवानगीसाठी 6 ऑगस्टपासून एपूण 3117 अर्ज आले. त्यापैकी 399 अर्ज हे पुनरावृत्ती स्वरूपात असल्याने बाजूला काढण्यात आले. त्यामुळे एपूण 2718 मंडळांच्य़ा अर्जांपैकी आतापर्यंत 1084 इतक्या म्हणजे 50.18 टक्के मंडळांना परवानगी देण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. n यामध्ये सर्वाधिक 243 अर्ज के-पूर्व विभागातून प्राप्त झाले, तर सर्वात कमी म्हणजे 25 अर्ज बी विभागातून आले आहेत.  सध्या 222 अर्ज एईएमच्या स्तरावर, वाहतूक विभागाकडे 431 प्रलंबित आहेत. वाहतूक पोलिसांनी 1583 मंडळांना ना हरकत दिली असून 43 अर्ज नामंजूर केले आहेत. स्थानिक पोलिसांनी नऊ प्रकरणांत मंजुरी दिलेली नाही.

आयटी सेक्शनच्या दिरंगाईमुळे गोंधळ

पालिकेने अर्ज स्वीपृती केल्यानंतर मिळणाऱ्या महिनाभराच्या कालावधीत सुमारे आठ ते दहा दिवस सुट्टीत गेले. यामध्ये वॉर्ड स्तरावर आणि ऑनलाइन काम झाले असले तरी याच काळात आयटी विभागाने सुट्टीच्या काळात काम केले नसल्याने ही समस्या निर्माण झाल्याचा आरोप बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे नरेश दहिबावकर यांनी केला आहे.

महसूल विभागाची परवानगीही लटकणार

पालिकेची परवानगीनंतर राज्याच्या महसूल विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. मंडपाचा नकाशासह इतर महत्त्वाच्या गोष्टींची तपासणी झाल्यानंतरच ना हरकत प्रमाणपत्र मिळणार आहे. याशिवाय पालिकेची परवानगी मिळाल्यानंतरच पोलीस, वाहतूक पोलिसांची ‘ना हरकत’ आणि बेस्टकडूनही मीटरची परवानगी मिळणार आहे.