दोन आठवड्यांपूर्वी पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अवघा देश राष्ट्रगीताची वाट पाहत होता, पण ते सूर निनादलेच नाहीत. मात्र गुरुवारपासून सुरू झालेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी नेमबाज अवनी लेखराने 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले आणि ज्या क्षणाची अवघा देश प्रतीक्षा करत होता ते ‘जन गण मन’चे सूर निनादले. दुसऱ्या दिवशी हिंदुस्थानने एका सुवर्णासह एक रौप्य आणि दोन कांस्य पदकेही पटकावली.
अवनीचे तिसरे पॅरालिम्पिक
अवनी वयाच्या बाराव्या वर्षीच एका कार अपघातात जखमी झाली आणि ती कमरेखाली अपंग झाली. व्हिलचेअरवर बसलेल्या अवनीने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णावर आपले नाव कोरले होते आणि पॅरिसमध्येही तिने त्याची पुनरावृत्ती केली. एवढेच नव्हे तर रिओ द जेनेरो स्पर्धेतही ती खेळली होती, पण तिला पदक जिंकता आले नव्हते.
हिंदुस्थानच्या 117 खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता, पण एकाही खेळाडूला सोने जिंकता आले नव्हते. त्यामुळे हिंदुस्थानी पथकाची मान शरमेने झुकली होती. मात्र ती कमी हिंदुस्थानच्या दिव्यांग अॅथलीटने पूर्ण केलीय. तीन वर्षांपूर्वी टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम करणाऱ्या अवनी लेखराने त्याच सुवर्ण क्षणांची पुनरावृत्ती करण्याचा इतिहास रचला. 10 मीटर एअर रायफल (एसएच 1) प्रकारात तिने आपली सर्वोत्तम कामगिरी करत 249.7 गुणांची कमाई केली. या लढतीत चीनच्या युनरी लीने अवनीला जोरदार लढत दिली.
शेवटच्या प्रयत्नात अवनीने 10.5 गुण संपादत अव्वल स्थान मिळवले, मात्र ली शेवटच्या प्रयत्नात अपयशी ठरली. तिला 6.8 गुणच मिळवता आले आणि तिचे सुवर्ण हुकले. तिला 246.8 गुण मिळवता आले. ती अवनीपेक्षा 2.9 गुण मागे राहिली. याच गटात हिंदुस्थानचीच मोना अगरवाल तिसरी आली. ती 228.7 गुणांसह खूप मागे असली तरी हिंदुस्थानसाठी आणखी एक कांस्य जिंकले. पात्रता फेरीत अवनीने 625.8 गुण मिळवले असले तरी इरिना शचेकनिकने 627. 5 गुणांसह पात्रता फेरीचा नवा इतिहास रचला होता, मात्र अंतिम फेरीत तिला 205.4 गुणांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
प्रीती पाल 100 मीटर शर्यतीत तिसरी
हिंदुस्थानसाठी दुसरा दिवस जबरदस्त ठरला. नेमबाजीत दोन पदके जिंकल्यानंतर प्रीती पालने 100 मीटर (टी 35) शर्यतीत 14.21 सेकंद ही आपली सर्वोत्तम वेळ देत कांस्य पदक जिंकले. या प्रकारात सुवर्ण आणि रौप्य चिनी खेळाडूंनी जिंकले. टी 35 म्हणजे ज्या खेळाडूंमध्ये हायपरटोनिया, अटॅक्सिया आणि अथेटोसिससह सेरेब्रल पाल्सीसारख्या शारीरिक व्यंगाचा समावेश असतो.
मनीष नरवालचे रुपेरी यश
टोकियो स्पर्धेत 50 मीटर पिस्टल प्रकारात सुवर्ण जिंकणाऱ्या नेमबाज मनीष नरवालने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल (एसएच1) प्रकारात रुपेरी यश संपादले. अत्यंत अटीतटीच्या लढतीत 234.9 गुण मिळवणाऱ्या मनीषला कोरियाच्या जोंगडू जोने 237.4 गुण मिळवत मागे टाकले. या स्पर्धेत काहीकाळ मनीषनेही आघाडी घेतली होती, पण जोंगडूने अचूक निशाणा साधत त्याच्यावर मात केली.