‘पेग’ रिचवल्यानंतर पोलिसांनी खुन्याला केले ‘पॅक’, वडाळा टी. टी. पोलिसांची कडक फिल्डिंग आणि नामी शक्कल

नामी शक्कल लढवत वडाळा टी.टी. पोलिसांनी एका सराईत माथेफिरू आरोपीला दिल्लीत कडक फिल्डिंग लावून पकडले. 12 वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केल्यानंतर गेल्या पाच महिन्यांपासून पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपीचा सुरू असलेला लपंडाव अखेर संपला. तो 21 तारखेला दिल्लीतल्या वेश्याव्यवसायात आल्याचे कळताच मुंबई पोलिसांनी शक्कल लढवली. आरोपी सटकता कामा नये म्हणून पोलिसांनी त्यांच्या तेथील खबऱ्याला आरोपीसोबत ‘बसायला’ लावले. मनसोक्त ‘पेग’ रिचवल्यानंतर पुरता झिंगल्यावर पोलिसांनी त्याला अलगद ‘पॅक’ केले.

वडाळा टी.टी. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांती नगर परिसरात राहणाऱ्या 12 वर्षांच्या मुलाचे 28 जानेवारी रोजी अपहरण झाले होते. त्यानंतर 5 मार्च रोजी वडाळ्यातील खारगंगा परिसरातील झुडपात मुंडके आणि उर्वरित शरीर विभक्त सडलेल्या अवस्थेत मिळून आले होते. हे कृत्य त्या मुलाच्या शेजारी असलेला आणि पसार झालेला बिपुल सिकारी (39) यानेच केल्याचे जवळपास निश्चित झाल्यानंतर उपायुक्त प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक योगेश चव्हाण, निरीक्षक विलास राठोड, धनंजय शिंदे, पाबळे आदी अधिकारी-कर्मचाऱ्यांची विविध पथके तयार करून पोलिसांनी बिपुलचा शोध सुरू केला होता.

‘असा’ सटकला बिपुल

पोलीस ठाण्यातून पळाल्यानंतर बिपुल अ‍ॅण्टॉप हिल, शीव, कल्याण, पुणे, दिल्ली, जम्मू, वैष्णोदेवी, हरिद्वार, यूपीतले शामली, लोणी, भोपुरा मग दिल्ली असा प्रवास करत लपून होता. बिपुल याने त्या मुलाचे लैंगिक शोषण केल्यानंतर त्याची गळा दाबून हत्या केली. आपण केलेले कृत्य मुलगा घरी सांगेल या भीतीपोटी त्याने हे कृत्य केल्याचे समजते. परंतु याव्यतिरिक्तदेखील बिपुल याने आणखी काही गंभीर गुन्हे केले असल्याचा पोलिसांना दाट संशय असून त्यादृष्टीने वडाळा टी. टी. पोलीस अधिक तपास करीत आहेत.