पैशांसाठी लहान मुलीला ग्राहकांसमोर नाचवणे घृणास्पद आहे. पण खटला कधी संपेल याची शाश्वती नसल्याने एका आरोपी महिलेला जामीन मंजूर करावा लागत आहे, असे परखड मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले.
धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलीला वडिलांनी विकले होते. एका कला पेंद्रात या मुलीला ग्राहकांसमोर नाचण्याची जबरदस्ती ही महिला आरोपी करत होती. या गुन्ह्यासाठी महिलेला गेल्या वर्षी अटक झाली. जामिनासाठी तिने याचिका केली होती. न्या. माधव जामदार यांच्या एकल पीठाने वरील परखड मत व्यक्त करत आरोपी महिलेला एक लाखाचा जामीन मंजूर केला.
अजून आरोप निश्चिती झालेली नाही
आरोपी महिलेला 22 मे 2023 रोजी अटक झाली. दोन महिन्यांत याचे आरोपपत्र दाखल झाले. 33 साक्षीदारांची यादी आरोपपत्रात आहे. यामध्ये एकूण 13 आरोपी आहेत. त्यातील चार आरोपी फरार आहेत. त्यांना अजून अटक झालेली नाही. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणात अद्याप आरोप निश्चिती झालेली नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
खटला वेळेत संपवण्याची जबाबदारी सरकारची
खटल्याची सुनावणी पारदर्शकच व्हायला हवी. हा आरोपीचा मूलभूत अधिकार आहे. तसेच वेळेत खटला संपवण्याची जबाबदारी राज्य शासनाचीच आहे, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.
शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव
अनिता काळे असे या महिला आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीला कला पेंद्रात ठेवण्यासाठी या महिलेने तिच्या वडिलांना पैसे दिले होते. ती या मुलीला ग्राहकांसमोर नाचण्यासाठी जबरदस्ती करायची. पुरुषांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात होता, असा पोलिसांचा आरोप आहे.
पाच ठिकाणी मुलीला विकले
पीडित मुलीचे आईवडील एकत्र राहत नाहीत. अवघी तीन वर्षांची असल्यापासून ती वडिलांसोबत राहते. अकरा वर्षांची असताना पीडितेला वडिलांनी एका कला पेंद्राला विकले. नराधम बापाने पैशांसाठी मुलीला टप्प्याटप्प्याने पाच कला केंद्रांत विकले. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलीने आईशी संपर्क झाला. त्यानंतर आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.