पॅरिसमधील महाराष्ट्राच्या ऑलिम्पिकवीरांचा उद्या पुण्यात गौरव

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या ऑलिम्पिक वीरांचा तसेच जागतिक स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंचा पुणेकर नागरिकांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात येणार आहे. सोमेश्वर फाऊंडेशन आणि क्रीडा जागृती यांच्या वतीने उद्या शनिवारी सकाळी 9 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे या समारंभाचे आयोजन केले आहे. हिंदुस्थानचे माजी हॉकी कर्णधार धनराज पिल्ले, सोमेश्वर फाऊंडेशनचे अध्यक्ष सनी निम्हण, क्रीडा जागृतीचे अध्यक्ष प्रताप जाधव व गौरव समितीचे सचिव संदीप चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

सत्कारमूर्ती खेळाडूंमध्ये पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदकविजेता नेमबाज स्वप्नील पुसाळे, ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले तिरंदाज प्रवीण जाधव आणि अ‍ॅथलीट सर्वेश पुशारे, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सर्वात कमी वयात सुवर्णपदकाला गवसणी घालणारी हिंदुस्थानची पहिली सुवर्णपदकविजेती सातारची महिला तिरंदाज ‘अर्जुन पुरस्कार’ सन्मानित आदिती स्वामी आणि तिरंदाजीमधीलच मूळचा नागपूरचा, पण सध्या सातारा येथे प्रवीण सावंत यांच्याकडे प्रशिक्षण घेत असलेला सुवर्णपदकविजेता अर्जुन पुरस्कार सन्मानित ओजस देवतळे, जगज्जेता मल्लखांबपटू पुण्याच्या महाराष्ट्रीय मंडळाचा विश्व अजिंक्यपद स्पर्धेत एक सुवर्ण आणि तीन रौप्यपदके पटकावणारा शुभंकर खवले यांचा समावेश आहे. तसेच मराठी क्रीडा पत्रकारितेत चार दशकांपेक्षा अधिक काळ पत्रकारिता करणाऱ्या विनायक दळवी, सुहास जोशी आणि शरद कद्रेकर यांचाही सन्मान यावेळी करण्यात येणार आहे.

बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या वाको युवा जागतिक किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत प्रीती पाटीलने कांस्य पदक पटकावण्याचा पराक्रम केला. तिने 15 वर्षांखालील दुहेरी प्रकारात स्कारलेट डायसच्या साथीने कांस्य पदक जिंकले. 50 पेक्षा अधिक संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत या खेळाडूंनी वाको इंडिया किकबॉक्सिंग महासंघाचे प्रतिनिधित्व केले होते. ही स्पर्धा 1 सप्टेंबरपर्यंत रंगणार आहे.