प्रेमसंबंधाच्या संशयावरून अनिकेत हिप्परकर याचा जामवाडीतील मरगूबाई मंदिरानजीक कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या खून प्रकरणात सहभागी असणाऱया चौघा अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. संशयित कृष्णा नदीकाठ परिसरात लपून बसले होते. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना जेरबंद केले.
मंगेश ऊर्फ अवधूत संजय आरते (वय 27, रा. मरगूबाई मंदिरानजीक, जामवाडी) आणि जय राजू कलाल (वय 18, रा. उदय मटण शॉपनजीक, जामवाडी) या दोघांना अटक केली. तर चार संशयित अल्पवयीन असल्याने त्यांना ताब्यात घेतले. अनिकेत हिप्परकर याचा खून नेमक्या कोणत्या कारणातून झाला, यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू होता. संशयितांना जेरबंद केल्यावर त्यांच्याकडे चौकशी केली असती तर त्याचा उलगडा झाला आहे.
संशयित मंगेश आरते यास त्याच्या नात्यातील एका महिलेसोबत मयत अनिकेत हिप्परकर याचे प्रेमसंबंध आहेत, असा संशय होता. तसेच, 23 ऑक्टोबर 2023 रोजी संशयित मंगेश आरते याच्या वाढदिवसादिवशी मयत अनिकेत याच्यासमवेत मंगेश याचा वाद झाला होता. त्यामुळे मंगेश याने अनिकेत हिप्परकर याचा काटा काढण्याचा प्लॅन केला होता. मंगळवारी सायंकाळी संशयित मंगेश याने सहकाऱयांच्या साहाय्याने डाव साधून अनिकेत याचा गेम केला. हल्ला केल्यावर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते.
घटना घडल्यावर सांगली शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी तातडीने पथके परिसरात रवाना केली होती. गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अंमलदार संतोष गळवे आणि गौतम कांबळे यांना संशयित कृष्णा नदीकाठ परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने नदीकाठ परिसरात धाव घेतली. हल्लेखोरांनी पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाठलाग करून पोलिसांनी सर्वांना जेरबंद केले. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक सागर गोडे, उपनिरीक्षक केशव रणदिवे, महादेव पोवार आणि प्रमोद खाडे, पोलीस कर्मचारी विनायक शिंदे, सचिन शिंदे, मच्छिंद्र बर्डे, संदिप कुंभार, योगेश सटाले आदींचा समावेश होता.