पाकिस्तानची मस्काबाजी, आयसीसी अध्यक्षांनी खिलाडूवृत्ती दाखवावी

पुढच्या वर्षी पाकिस्तानात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. मात्र या स्पर्धेत हिंदुस्थानी क्रिकेट संघ खेळण्याची शक्यता कमी असल्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट मंडळाला (पीसीबी) आतापासून दिवसा तारे दिसायला लागलेत. त्यातच आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शहा यांची निवड झाल्यामुळे त्यांच्यावर अस्मान कोसळल्याची भावना निर्माण झालीय. त्यामुळे पीसीबीच नव्हे तर पाकिस्तानच्या आजीमाजी क्रिकेटपटूंनी हिंदुस्थानी क्रिकेटपटूंची, आयसीसी अध्यक्षांना मस्काबाजी करायला सुरूवात केलीय.

गेल्या महिन्यात कोलंबोत झालेल्या आयसीसीच्या बैठकीत जय शहा हे भावी अध्यक्ष होणार असल्याचे संकेत मिळालेच होते. तेव्हापासून पाकिस्तानी क्रिकेटचे धाबे दणाणले होते. मात्र आता शहा अध्यक्ष झाल्यापासून पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंनी भावनिक मस्काबाजी करत हिंदुस्थानी क्रिकेटपटूंचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक कामरान अकमल म्हणतो, विराट कोहली आणि रोहित शर्मा हे पाकिस्तानात कधीच खेळले नाहीत. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याआधी एकदा तरी पाकिस्तानात यावे. दोघे टी-20 मधून निवृत्त झालेत, पण चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दोघांनी पाकिस्तानात खेळावे. दोघांचेही लाखो चाहते पाकिस्तानात आहेत. त्यांना पाकिस्तानात जे प्रेम मिळेल, त्यामुळे क्रिकेटच्या सर्व सीमा पार होतील.

कामरानप्रमाणे युनूस खाननेही जय शहा यांनी साकडे घातलेय की क्रिकेटच्या विकासासाठी खिलाडूवृत्ती दाखवावी आणि हिंदुस्थानी क्रिकेट संघांना पाकिस्तानात खेळण्यासाठी हिरवा पंदिल दाखवावा. तब्बल दोन दशके हिंदुस्थानी संघ पाकिस्तानात खेळलेला नाही.2008 च्या आशिया चषकानंतर हिंदुस्थानी क्रिकेटपटू पाकिस्तानात आले नाहीत.