क्रिकेटच्या पंढरीत आचरेकरांचे पूर्णाकृती शिल्प, नव्या पिढीवरही असणार गुरू द्रोणाचार्यांची नजर

आपल्या अद्भुत मार्गदर्शनामुळे क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गजांना घडवणाऱ्या क्रिकेटचे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सरांची नजर क्रिकेटच्या नव्या पिढीवरही असेल. क्रिकेटच्या रथी-महारथींना घडवणाऱ्या शिल्पकाराच्या कारकीर्दीला मानाचा मुजरा करण्यासाठी त्यांचे पूर्णाकृती शिल्प मुंबई क्रिकेटच्या पंढरीत अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात (शिवाजी पार्क) साकारले जाणार आहे.

हिंदुस्थानी क्रिकेटचे अर्जुन घडवण्यासाठीच रमाकांत आचरेकर यांनी आपले पूर्ण आयुष्य अर्पण केले. शिवाजी पार्कच्या लाल मातीतच त्यांनी आपल्या शिष्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांचा घाम काढला. त्यांना क्रिकेटचे सारे बारकावे शिकवले. त्यांच्या या योगदानाला मानाचा मुजरा करण्यासाठीच राज्य सरकारने गेट नं 5 वर त्यांचा सहा फुटी पूर्णाकृती पुतळा साकारण्याचे आज जाहीर केले.

आचरेकरांनी आपल्या कारकीर्दीत मुंबई क्रिकेट खेळाडूंची अक्षरशः फौज उभारून दिली. त्यापैकी सचिनसह विनोद कांबळी, चंद्रकांत पंडित, प्रवीण अमरे, अजित आगरकरसारखे अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले. आचरेकरांच्या शिल्पाची काळजी आणि व्यवस्थापन कामथ मेमोरियल क्रिकेट क्लब घेणार असून या शिल्पाच्या निर्मितीसाठी कोणतेही आर्थिक सहाय्य राज्य सरकारकडून घेतले जाणार नाही.

शिष्य सचिन भारावला

शिवाजी पार्कवर आपल्या गुरूंचे शिल्प साकारले जाणार असल्याचे कळताच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही भारावला. तो म्हणाला, आचरेकर सरांचा माझ्यासह अनेक लोकांच्या आयुष्यावर प्रचंड प्रभाव राहिला आहे. मी त्यांच्या सर्व शिष्यांच्या वतीने बोलतोय. त्यांचे पूर्ण आयुष्यच शिवाजी पार्कच्या अवतीभवती होते. तिथेच आयुष्यभर राहण्याची त्यांची इच्छा असावी. मी आचरेकरांच्या कर्मभूमीत त्यांचा पुतळा बनवण्याच्या सरकारी निर्णयाने खूप आनंदित झालो आहे.