अजित पवारांच्या सभेत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी; पोलिसांशी झालेल्या झटापटीत चार जखमी

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीवरून प्रचंड घोषणाबाजी केली. निवेदन देण्यासाठी जाणार्‍या आंदोलकांना पोलिसांनी अडवल्याने गोंधळ झाला. यावेळी पोलिसांशी झालेल्या झटापटीत चार आंदोलक जखमी झाले.

वसमत येथे अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचे बुधवारी रात्री आगमन झाले. शहरात येताच अजित पवारांचे क्रेनच्या माध्यमातून गुलाबाचा हार घालून स्वागत करण्यात आले. अजित पवार सभास्थळी येताच महिला निघून गेल्या. त्यामुळे अर्धा मंडप रिकामा झाला. अजित पवार व्यासपीठावर येताच मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणा द्यायला सुरूवात केली. घोषणा देत आंदोलक निवेदन देण्यासाठी जात असताना पोलिसांनी अडवले. त्यामुळे गोंधळ उडाला. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. यात नंदकुमार सवंडकर, प्रल्हाद राखोंडे, देवराव राखोंडे आदी जखमी झाले.