>> अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलाचे नाव केवळ राज्यातच नव्हे तर देश्यात गाजले होते. त्याला कारण ठरले 67 वी राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धा. राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटनला हजेरी लावली होती. मात्र त्याच क्रीडा संकुलातील कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी संकुलातील विद्युत डीपी विकण्याच्या दुदैवी प्रसंग क्रीडा संकुल प्रशासनावर ओढावला अशी चर्चा रंगली आहे. डीपी विकून त्यांनी कर्मचाऱ्यांना तीन महिन्याचे वेतन दिलं.आता मात्र सहा महिन्याचे कर्मचाऱ्याचे वेतन थकीत आहे. आता विकण्यासारखं काहीच नसल्याने क्रीडा संकुलातील प्रशासनाने सुद्धा हातवर केले आहेत.
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जिल्ह्यातील क्रीडा संकुलातील कर्मचाऱ्यांना वेतनाअभावी आर्थिक संकटाच्या सामना करावा लागत आहे हे मोठेच दुर्दैव असल्याच्या चर्चा नागरिक करत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलात 67 वी राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धा पार पडली होती. हा कार्यक्रम भव्यदिव्य झाला. रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. कार्यक्रमात केलेल्या रोषणाईमुळे अवाजवी विद्युत देयक आले. त्याची भरणा न केल्याने विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. या प्रकारावरून मुनगंटीवार यांना टीकेचा सामना करावा लागला होता. आता याच क्रीडा संकुलातील कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी पैसे नाहीत. तीन महिन्याचे वेतन देण्यासाठी क्रीडा संकुलातील विद्युत डीपी विकल्याची चर्चा आहे.
आता परत कर्मचाऱ्यांचे सहा महिन्याचे वेतन थकीत आहे. 10 कर्मचारी या संकुलात कामावर होते. पगार न मिळाल्याने 5 जणांनी काम सोडून दिले. इतर कर्मचारी देखील रामराम करण्याच्या तयारीत आहे. कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाकडे मंत्रीमहोदयांचे दुर्लक्ष आता उघड पडल्याने आता त्यांच्यावर टीका होत आहे.
दरम्यान, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.