सध्या सोशल मीडियाच्या या जगात फसवणुकीच्या घटना दररोज घडत आहे. या फसवणुकीला सामान्य लोकांपासून ते अगदी श्रीमंतांपर्यंत सगळेच बळी पडतात. अशीच एक घटना पीपीजी एशियन पेंट्समधील व्यवस्थापकासोबत घडली आहे. पीपीजी एशियन पेंट्समध्ये व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या 53 वर्षीय व्यक्तीला इन्स्टाग्रामवरील जाहिरातीमुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.
अमित अमेनबल असे या व्यक्तीचे नाव असून ते मुंबईतील रहिवासी आहेत. अमित एशियन पेंट्सचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. अमित यांनी मे महिन्यात सोशल मीडियावर शेअर बाजारातील गुंतवणुकीशी संबंधित जाहिरात पाहिली होती. या जाहिरातीत कमी गुतवणुक करून जास्त परतावा मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. अशा संकल्पना आणि गुंतवणुकीचा अनुभव घ्यायचा असेल तर खाली व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंक देण्यात आली होती.
अमित यांनी उत्सुकतेने ‘जॉईन’ बटणावर क्लिक केले आणि ते थेट ‘MSFL स्टॉक चार्ट 33’ नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये अॅड झाले. या ग्रुपमध्ये 144 सदस्य होते. ग्रुपमध्ये अॅड झाल्यानंतर ग्रुप ॲडमिन जुही पटेलने एक लिंक शेअर केली. यामध्ये ‘मारवाडी आर्थिक सेवा’ साठी सर्व वैयक्तिक तपशीलांसह एक फॉर्म भरण्यास सांगितले. त्यानंतर, त्या व्यक्तीच्या नावावर एक आभासी खाते तयार करण्यात आले. यानंतर अमित यांनी 20 हजार रुपयांचे शेअर्सही खरेदी केले. त्यातून 22,915 रुपये नफा झाला, जो त्याच्या खात्यात जमा झाला होता, असे अमित यांनी केंद्रीय सायबर विभागाकडे नोंदवलेल्या तक्रारीत सांगितले.
आपल्या गुंतवणुकीवर योग्य नफा मिळत असल्यामुळे अमितने एका महिन्यातच आणखी मोठी रक्कम गुंतवली. मात्र, जेव्हा त्याने त्याचा नफा मागितला तेव्हा जुहीने पैसे काढण्याच्या प्रक्रियेसाठी 80 लाख रुपयांचे कमिशन मागितले. तेव्हा त्या अमित यांनी कमिशन देण्यास नकार दिला. यासंदर्भात आता अमित यांनी केंद्रीय सायबर विभागाकडे तक्रार नोंदवली असून पुढील तपास सुरू आहे.