भूमिपुत्रांचा विरोध डावलून होत असलेल्या वाढवण बंदराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला राज्यभरातील मच्छीमारांनी कडाडून विरोध केला आहे. या बंदराचे भूमिपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी ३० ऑगस्ट रोजी होत असून याच दिवशी राज्यभरातील मच्छीमार रस्त्यावर उतरणार आहेत. केंद्र सरकारच्या या दडपशाहीचा विरोध करण्यासाठी पालघरच्या किनाऱ्यावर केंद्र सरकारची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे, तर उत्तन, मढ, मर्वे, गोराई येथील मच्छीमार समुद्रात जलसमाधी घेणार आहेत. शुक्रवारी विविध ठिकाणी छेडण्यात येणाऱ्या आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी आज उत्तन येथे पार पडलेल्या सभेला भूमिपुत्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
वसई तहसील कार्यालयावर मोर्चा
भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला एकमताने विरोध करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला असून वाढवण किनाऱ्यावर होणाऱ्या सरकारच्या प्रेतयात्रा आंदोलनात मोठ्या संख्येने मच्छीमार सहभागी होणार आहेत. वसई येथील मच्छीमार भूमिपूजन कार्यक्रमाच्या विरोधात वसई तहसील कार्यालयावर मोर्चा नेणार आहेत. उत्तन, मढ, मावें, गोराई येथील मच्छीमार समुद्रात जलसमाधी घेऊन आणि काळे झेंडे दाखवून विरोध करणार आहेत.
वाढवण बंदरामुळे फक्त पालघर जिल्ह्यातीलच नाही तर मुंबई आणि ठाणे परिसरातील मासेमारी धोक्यात येणार आहे. त्यामुळे या बंदराला भूमिपुत्रांनी कडाडून विरोध केला आहे. हा विरोध डावलून केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी या बंदराचे भूमिपूजन करण्याचा घाट घातला आहे. या बंदराच्या विरोधात भूमिपुत्रांनी पुकारलेल्या लढ्यात आता राज्यभरातील मच्छीमार सहभागी झाले आहेत. शुक्रवारी होत असलेल्या भूमिपूजन कार्यक्रमाचा निषेध करण्यासाठी राज्यभरातील सर्व मच्छीमार रस्त्यावर उतरणार आहेत, असे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे युवा अध्यक्ष मिल्टन सौदिया यांनी आज उत्तन येथे झालेल्या सभेत जाहीर केले.
या सभेला मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल, कार्याध्यक्ष बर्नार्ड डिमेलो, सरचिटणीस संजय कोळी, युवा अध्यक्ष मिल्टन सौदिया, विन्सन बांड्या, जॉन गऱ्या, नाझरेध गोडबोले, एडविन केळीखादया, जॉन्सन भयाजी, डिकसन डीमेकर, पास्कू मनभाट, स्टिफन कासुघर, विलियम गोविंद, पास्कोल पाटील, चंद्रकांत फाजींदार, माल्कम कासुकर, लिन्टन मुनिस, लॉरेन्स घोसाल, सचिन मिरांडा, जितेंद्र कोळी, अंतोनी तान्या, किशोर कोळी, रुपेश डिमेकर आदी उपस्थित होते.
सर्बानंद सोनोवाल आज पालघरमध्ये
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी उद्या केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल हे पालघरमध्ये येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत फेर्न शेल्टर रिसॉर्टमध्ये कार्यक्रम पार पडणार आहे. याप्रसंगी केंद्रीय सचिव टी. के. रामचंद्रन आणि जेएनपीएचे चेअरमन उन्मेष वाघ हे उपस्थित राहणार आहेत. भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी चारशे बसेस आणण्याची जबाबदारी जेएनपीएवर देण्यात आल्याने प्रशासनाची पळापळ सुरू झाली आहे.
वाढवण बंदर ही एक आपत्ती
वाढवण बंदर प्रकल्पामुळे फक्त डहाणू तालुक्यातील मच्छीमार बाधित होणार नसून मुंबई, ठाणे, उत्तन, वसई, अर्नाळा, सातपाटी येथील मासेमारी व्यवसाय बाधित होणार आहे. कारण समुद्रातील एकूण ३० हजार एकर क्षेत्र मासेमारीसाठी प्रतिबंधित करण्यात येणार असल्याचे मत्स्यकी संशोधन संस्थेच्या अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रकल्प एमएमआरडीए क्षेत्रातील मच्छीमारांसाठी एक आपत्ती ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया वाढवण बंदरविरोधी कृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नार्ड डिमेलो यांनी व्यक्त केली.