खासगी टुरिस्ट बसमधून तस्करी; 30 पोपट, कबुतरे, घारींची सुटका

खासगी टुरिस्ट बसमधून वन्यजीवांच्या तस्करीचा डाव वाईल्ड वेल्फेअर असोसिएशन या वन्यजीव संरक्षक संघटनेने उधळला आहे. भिवंडीतील पडघा येथे केलेल्या या कारवाईत वन्यजीव रक्षकांनी तीन दुर्मिळ पक्ष्यांसह 30 पोपट आणि कबुतरांना वनविभागाच्या स्वाधीन केले. हे वन्यजीव मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये विक्रीसाठी नेण्यात येत होते. मात्र त्याआधीच अत्यंत शिताफीने बसची तपासणी केल्यानंतर दुर्मिळ पक्ष्यांसह पोपट आणि कबुतरांची सुटका करण्यात आली.

मालेगाव येथून 25 ऑगस्ट रोजी खासगी टुरिस्ट बसच्या बॅटरीच्या कंपार्टमेंटमध्ये लपवून काही जण वन्यजीवांची तस्करी करीत असल्याची माहिती वन्यजीव संरक्षक मिळाली. त्यानुसार ठाणे जिल्हा वन्यजीव रक्षक राकेश मोहिते, सदस्य सुशील गायकवाड, अभिजीत मोरे, श्लोक सिंग, सुवेद रासम आदींनी पडघा टोलनाक्यावर फिल्डिंग लावली. तसेच टोलनाका येथे शिरकाव करण्यापूर्वी पोलिसांच्या मदतीने बस थांबवून आपल्या एका सदस्याला बसमध्ये चढवला.

त्यानंतर वनविभागाच्या मदतीने बस ठाण्यात आल्यावर बसची झाडाझडती घेतली असता लक्झरी बसच्या बॅटरीच्या कंपार्टमेंटमध्ये 30 रोझ रिंग पॅराकीट (पोपट), तीन दुर्मिळ ब्लॅक शोल्डर विंग काईट आणि कबुतरे व कोंबड्या असा मुद्देमाल हस्तगत केला. यातील कोंबड्या वगळता अन्य वन्यजीवांची पशुवैद्यकीय तपासणी करून त्यांची वन अधिवासात मुक्तता करण्यात आली. हे वन्यजीव मुंबईतील मदनपुरा, कॉफर्ड मार्केट येथे विक्रीसाठी नेण्यात येणार होते, अशी माहिती डब्ल्यूडब्ल्यूएचे मानद वन्यजीव रक्षक राकेश मोहिते यांनी दिली. तसेच याप्रकरणी बसचालक आणि वाहक यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याआधी तस्करी केल्याचे उघड

मालेगावमधून मोठ्या प्रमाणात वन्यजीव पशुपक्ष्यांची तस्करी याआधी केल्याची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून तशी कबुली देण्यात आली असून वन्यजीव तस्करांचा दलालापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. याप्रकरणी वनविभाग अधिकारी अधिक तपास करीत आहेत.