पिसाळलेल्या कुत्र्याने लचके तोडलेल्या चिमुकलीचा मृत्यू

पिसाळलेल्या कुत्र्याने लचके तोडलेल्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चिमुकलीवर गेल्या एक महिन्यापासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान लायबा शेख या चिमुकलीने मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. या दुर्दैवी घटनेनंतर पालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.

पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले. यात लायबाचादेखील समावेश होता. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेथे तिच्यावर तीन दिवस उपचार करून घरी पाठवले. परंतु काही दिवसांनी जखम चिघळल्याने तिची प्रकृती पुन्हा बिघडल्याने तिला मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान लायबाचा मृत्यू झाला. ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचार करताना हलगर्जीपणा केल्याचा आरोप आजोबा रियाज शेख यांनी केला आहे.

नसबंदी कागदावरच

गेल्या दहा वर्षांपासून भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यात आलेली नाही. त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकदा तक्रारी करूनही पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे. या भटक्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पालिका प्रशासनाच्या बेजाबदारपणामुळे चिमुकलीचा बळी गेल्याचा आरोप केला जात आहे. महापालिका प्रशासनाविरोधात योग्य ती चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार रईस शेख यांनी केली आहे.