Bhandara news कामगारावर कोसळला लोखंडी रॉड, उपचारादरम्यान मृत्यू

वेल्डिंगचे काम करीत असताना अंगावर लोखंडी ट्रेलरचा मोठा रॉड कोसळला. यात 49 वर्षीय कंत्राटी कामगार गंभीररीत्या जखमी झाला. यात त्याचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. कुंवरलाल रहांगडाले (रा. लाला लजपतराय वॉर्ड, भंडारा) असे मृत कामगाराचे नाव आहे. ही घटना वरठी येथील सनफ्लॅग कंपनीत घडली.

कुंवरलाल रहांगडाले हे सनफ्लॅग कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होते. ते जे. के. ट्रान्सपोर्ट नामक कंत्राटदाराकडे कार्यरत होते. सायंकाळच्या सुमारास वेल्डिंगचे कार्य सुरू होते. याचवेळी त्यांच्या अंगावर लोखंडी ट्रेलरचा मोठा रॉड कोसळला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. मृत कुंवरलाल रहांगडाले हे घरचे कमावते व्यक्ती असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.