बलात्काऱ्यांना 7 दिवसांत फाशीची शिक्षा! ममता बॅनर्जी यांनी केली नव्या कायद्याची मागणी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी तृणमूल छात्र परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संवाद साधला. बलात्कार विरोधी कायद्याबाबत आम्ही विधेयक आणू, ज्यामध्ये आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होईल, अशी तरतूद करण्यात येणार असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात 9 ऑगस्ट रोजी प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी मोठे विधान केले आहे. बलात्कार करणाऱ्याला सात दिवसांत आत फाशीची शिक्षा होईल, अशा कायद्याचे विधेयक लवकरच मंजूर करणार असल्याचे सांगितले आहे.

याबरोबरच, पुढच्या आठवड्यात आम्ही विधानसभेचे अधिवेशन बोलवू, विधेयक राज्यपालांकडे पाठवू. 10 दिवसांतचं विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न करू. हे विधेयक मंजूर व्हायला हवे, यावेळी ते जबाबदारी टाळू शकत नाहीत. विधेयक मंजूर न झाल्यास आम्ही राजभवनाबाहेर आंदोलन करू, असा इशाराही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिला.

डॉक्टरच्या मृत्यूवरून गलिच्छ राजकारण करून भाजप पश्चिम बंगालला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. भाजपने बुधवारी बंगाल बंदची हाक दिली होती. भगवा पक्ष तोडफोड करत आहे आणि त्यांचे कार्यकर्ते पोलिसांवर हल्ले करत आहेत. तृणमूल काँग्रेस त्यांच्या या बंदच्या राजकारणावर विश्वास ठेवणार नाही, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली.

उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यातील महिलांवर सुरू असलेल्या अत्याचारांमुळे राजीनामा दिला आहे का? असा प्रश्न ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे.

कोलकातामधील डॉक्टर तरुणीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणात शक्य ते सर्व प्रयत्न करत असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. आरोपी संजय रॉय याला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठीही राज्य सरकारने दबाव आणल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्याकडे अधिकार असले असते तर बलात्कार करणाऱ्याला सात दिवसांत फाशीची शिक्षा दिली असती, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.