आदित्य ठाकरेंनी राजकोट किल्ल्याला भेट देताना निलेश राणेंचा थयथयाट, पोलिसांवर गेले धावून

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही दिवसांपूर्वी कोसळला. यानंतर अवघ्या राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. विरोधी पक्षांनीही सत्ताधारी मिंधे सरकारच्या कामावर प्रश्न उपस्थित करून त्यांना लक्ष्य केले आहे.

दरम्यान, या ठिकाणची पाहणी करण्यासाठी आणि राजकोट किल्ल्यावर महाराजांसमोर नतमस्तक होण्यासाठी आज शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर गेले होते. यामध्ये जयंत पाटील, अंबादस दानवे, आमदार वैभव नाईक यांचा समावेश होता.

मात्र आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना किल्ल्यावर जाऊ द्यायचे नाही म्हणून सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे आणि त्यांचा मुलगा भाजप नेते निलेश राणे तिथेच उपस्थित होते. आदित्य ठाकरे आणि मविआचे नेते किल्ल्याच्या परिसरात पोहोचले तेव्हा भाजप आणि राणे समर्थकांनी घोषणाबाजी केली आणि त्यांना रोखण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. निलेश राणे यांनी तर अक्षरश: थयथयाट सुरू केला. ते पोलिसांच्या अंगावर देखील धावून गेले. मात्र पोलिसांनी संयमीपणे त्यांना ऐकून घेण्याची विनंती केली. याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.