वीर व उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी पंढरपूर शहरातील व्यासनारायण व अंबाबाई झोपडपट्टीत शिरले आहे. त्यामुळे 100 कुटुंबांचे सोमवारी रात्रीच स्थलांतर करण्यात आले आहे. पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन आज 70 कुटुंबांना नोटिसा देण्यात आल्या असून, त्यांचेही स्थलांतर करण्यात येत आहे. चंद्रभागा नदीपात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याने वेढा दिला आहे. नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
उजनी व वीर धरणाच्या खोऱ्यात सुरू असलेल्या पावसामुळे वीर, उजनी धरण 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे उजनी धरणातून 81 हजार 600 क्युसेकने, तर वीर धरणातून 63 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. या दोन्ही धरणांतून नदीपात्रात सुमारे 1 लाख 44 हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. पंढरपूर येथे मंगळवारी सायंकाळी 6 वाजता 1 लाख 30 हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता.
या पाण्याने चंद्रभागा नदीपात्रातील जुना दगडी पूल, इतर 8 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत, तर 1 लाख 30 हजार क्युसेक पाणी आल्याने व्यासनारायण व अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथील 25 घरांत पुराचे पाणी शिरल्याने या कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे, तर विसर्गात होणारी वाढ लक्षात घेऊन मध्यरात्री नदीकाठच्या व्यासनारायण व अंबाबाई झोपडपट्टी भागातील सुमारे 100 कुटुंबे स्थलांतरित करण्यात आली आहेत. या नागरिकांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था रायगड दिंडी समाज मठात करण्यात आली आहे, असे तहसीलदार सचिन लंगुटे यांनी सांगितले.
प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव, तहसीलदार सचिन लंगुटे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुनराव भोसले, उपमुख्याधिकारी ऍड. सुनील वाळूजकर, पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, लक्ष्मणराव शिरसट, विक्रम शिरसट, शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, राजकुमार सपाटे, अभिलाषा नेरे, ऋषिकेश अधटराव परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. या ठिकाणी परिस्थितीचा अंदाज घेऊन काम पाहत आहेत.