Cidco Lottery 2024 – नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर; सिडकोकडून 902 घरांसाठी लॉटरी

नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी सिडकोने खूशखबर दिली आहे. सिडकोकडून 902 घरांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर 27 ऑगस्टपासून या योजनेच्या सोडतीसाठी अर्ज करता येणार आहे. सिडकोची ही घरं कळंबोली, खारघर आणि घणसोली येथील गृह प्रकल्पांमधील आहेत. एकूण 902 घरांसाठी ही सोडत निघणार आहे.

या घरांसाठी अर्ज सादर करण्यासाठी सिडकोच्या वेबसाईटवर 27 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. सिडकोची ही घरं आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, खुला प्रवर्ग, मध्यम उत्पन्न गटांसाठी आहेत. कळंबोली, खारघर आणि घणसोली येथे एकूण 213 घरं आहेत. यापैकी 175 सर्वसामान्य प्रवर्गासाठी तर 38 घरं आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी आहेत. खारघरमधील सिडकोच्या सप्नपूर्ती आणि वास्तूविहार सेलीब्रेशन येथे 689 घरं आहेत.

खारघरमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी 31 घरं असून त्याची किंमत सर्वसाधारणपणे 26 लाख 49 हजार 718 रुपये इतकी आहे. कळंबोली येथे ईडब्ल्यूएस साठी 6 घरं असून त्याची किंमत सर्वसाधारणपणे 26 लाख 32 हजार 368 रुपये इतकी आहे. घणसोलीत येथे ईडब्ल्यूएस साठी 1 घर असून त्याची किंमत सर्वसाधारणपणे 26 लाख 9 हजार 420 रुपये इतकी आहे.

खारघर सर्वसाधारण गटासाठी 143 घरं असून तेथील घरांची किंमत 37 लाख 95 हजार 173 रुपये आहे. कळंबोली येथे सर्वसाधारण गटासाठी 31 घरं असून त्याची किंमत सर्वसाधारणपणे 37 लाख 47 हजार 159 रुपये इतकी आहे. घणसोलीत येथे सर्वसाधारण गटासाठी 31 घरं असून त्याची किंमत सर्वसाधारणपणे 36 लाख 72 हजार 505 रुपये इतकी आहे. खारघर सेलीब्रेशन येथे 10 घरं असून ती मध्यम उत्पन्न गटासाठी आहेत. त्याची किंमत 66 लाख रुपये आहे. उच्च उत्पन्न गटासाठी 23 घरं असून त्याची किंमत 1 कोटी 13 लाख 93 हजार रुपये इतकी आहे. स्वप्नपूर्ती येथील प्रकल्पात ईडब्ल्यूएससाठी 42 घरं असून घरांची किंमत 37 लाख इतकी आहे. तर, सर्वसाधारण गटासाठी इथं 359 घरं असून त्याची किंमत 46 लाख 48 हजार इतकी आहे.

व्हॅली शिल्प येथील उच्च उत्पन्न गटासाठी 136 सदनिका आहेत.येथील एका घराची किंमत 2 कोटी 5 लाख 5 हजार रुपये आहे. तर, मध्यम उत्पन्न गटसाठी 118 घरं असून एका घराची किंमत 1 कोटी 7 लाख 26 हजार रुपये आहे. या घरांच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी अटी आणि घरांबाबतची सविस्तर माहिती सिडकोच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.