पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार काल एका व्यासपीठावर होते, याचा संदर्भ देत, तुम्ही ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बद्दल मोदी यांना ‘भटकती आत्मा’ या वक्तव्याबाबत विचारलं का? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, अजित पवार भडकले. म्हणाले, हे निवडणुकांपूर्वी केलेले वक्तव्य होतं. त्यानंतर पुलाखालून खूप सारे पाणी वाहून गेलं आहे. मात्र, आता तो विषय संपलेला आहे. उगीच उकिरडा उकरत बसायचं नसतं, असे उत्तर अजित पवार यांनी दिले.
पुण्यातील सरकारी इमारतींचे उद्घाटन आणि भूमिपूजनानंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना ‘भटकती आत्मा’, असे म्हटले होते. मोदी यांना पुढच्या वेळी आल्यावर विचारतो, असे म्हटले होते. या भूमिकेवर अजित पवार यांनी घुमजाव करून प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारालाच लोकसभा निवडणूक झाली, त्यानंतर पुलाखालून किती पाणी वाहून गेले, तू पाहिलं का? असा प्रतिप्रश्न केला.
पोर्शे अपघात प्रकरणांमध्ये सरकारने काही लोकांना पाठीशी घातलं असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला असल्याच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, हे धादांत खोटे आहे. या प्रकरणांमध्ये कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. याबाबत जर कुणाकडे पुरावे असतील, तर त्यांनी ते द्यावेत.
सहायक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याच्या घटनेवर बोलताना अजित पवार म्हणाले, काल घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून, या संदर्भातील आरोपीला कडकमधली कडक कारवाई केली जाणार आहे. पोलिसांचा दबाव हा गुन्हेगारांवर असलाच पाहिजे. गुंडप्रवृत्तीचे जे लोकं आहेत, अशांवर कारवाई करणे, हे आमचे काम आहे. परंतु, याबाबतची अधिक माहिती पोलीस आयुक्तांकडून घेणार आहे.
पूरग्रस्तांना मदतीचा धनादेश…
काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामध्ये शहरातील काही भागातील घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी गेल्याच्या घटना घडल्या होत्या. त्या पूरग्रस्तांना आज दहा हजार रुपयांचा चेक देण्यात आला. उर्वरित पूरग्रस्तांना डीबीटीद्वारे मदत दिली जाणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
पीएमपीएल कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणार
सातवा वेतन आयोगाचा फरक देण्याचा निर्णय झाला असला, तरी तो अद्यापि देण्यात आलेल्या नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता असून, हा फरक तातडीने देण्यात यावा, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच कॉण्ट्रॅक्ट पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनादेखील कायम करण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले.