नगर जिह्यातील नेवासा तालुक्यातील सोनईजवळील खेडले परमानंद येथील स्वस्त धान्य दुकानदाराने केवायसीच्या नावाखाली जून महिन्याचा रेशनचा साठाच गायब करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे पुरवठा विभागाच्या कारभाराची लक्तरे चव्हाट्यावर टांगली गेली आहेत.
केंद्र शासनाच्या किमान सामायिक कार्यक्रमांतर्गत गरिबांना केंद्रस्थानी मानून दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांना सवलतीच्या दराने अन्नधान्य पुरविण्याची योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे. शहरी व ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकानामार्फत लाभार्थी कुटुंबांना धान्य पुरवले जाते. मात्र, अनेकदा स्वस्त धान्य दुकानदाराकडून नागरिकांना धान्यवाटप करताना गैरप्रकार होत असल्याच्या घटना घडत आहेत.
यापूर्वीही नेवासा पुरवठा विभागाचा मयत विवाहित आणि स्थलांतरित झालेल्या नागरिकांचा साठा गेल्या पंधरा वर्षांपासून कुठे जातो, याबाबत चांगलीच चर्चा झाली होती. त्यानंतर प्रशासनाने रेशन कार्डमधील सर्व नावांची केवायसी करण्याची प्रक्रिया चालू केली होती. त्यातही कळस म्हणजे खेडले येथील दुकानदाराने जून महिन्याचा रेशनचा साठा गायब करण्याचा प्रकार उघडीस आला आहे. संबंधित धान्य दुकानदाराने लोकांचे अंगठे घेऊन जून महिन्यातील रेशनचे वाटप झाल्याचा पुरवठा विभागाला दाखविले आहे. मात्र, प्रत्यक्षात जून महिन्यातील रेशनवाटप झालेच नाही. याबाबत दुकानदाराला विचारणा केली असता, अपर तहसीलदार यांनी रेशन दुकानाला सील ठोकल्यामुळे रेशनवाटप करता आले नाही, असे सांगण्यात आले. मात्र, या गोष्टीमुळे खेडले परमानंद येथील लाभधारक धान्यापासून वंचित राहिले. संबंधित अधिकाऱयाने चौकशी करून संबंधित अधिकारी, स्वस्त धान्य दुकानदार यांची चौकशी करून रेशन देण्याची मागणी होत आहे.
पुरवठा विभागाच्या अनागोंदी कारभाराची यापूर्वीदेखील अनेक उदाहरणे समोर आलेली आहेत. त्यात सुधारणा करण्यात आल्या. मात्र, आजही या विभागात मोठय़ा प्रमाणात नियोजनाचा अभाव असल्याचे समोर येत आहे.