कंगना राणावत यांच्या विधानावरून भाजपवर नाक घासण्याची वेळ; भविष्यात असे विधान न करण्याची तंबी

खासदार कंगना राणावत यांनी राजधानी दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनाबद्दल केलेल्या विधानावरून भाजपवर नाक घासण्याची वेळ आली. राणावत यांचे ते व्यक्तिगत मत असून भाजप त्याच्याशी सहमत नसल्याचे भाजपने जाहीर केले आहे. एवढेच नाही तर पक्षाच्या धोरणात्मक बाबीत मचमच न करण्याची तंबीही खासदार राणावत यांना भाजपने दिली आहे.

हिमाचल प्रदेशच्या मंडी येथील खासदार कंगना राणावत यांची एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीत खासदार राणावत यांनी शेतकरी आंदोलनाबद्दल अतिशय बेमुर्वत विधान केले. शेतकरी आंदोलन जिथे झाले तिथे मृतदेह लटकत होते. महिलांवर बलात्कार झाले. भाजपचे नेतृत्व मजबूत नसते तर बांगलादेशसारखी परिस्थिती झाली असती. परदेशी शक्तींनी रचलेला हा एक भयंकर असा कट होता, असे बेलगाम वक्तव्य खासदार राणावत यांनी केले.

राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करा
खासदार कंगना राणावत यांच्या या विधानावरून प्रचंड खळबळ उडाली. काँग्रेसने त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली. जर परदेशी शक्ती देशाच्या अंतर्गत कारभारात दखल देत असतील तर मोदी सरकारने त्याबाबतची माहिती देशाला दिली पाहिजे. अशा शक्तींना रोखण्यासाठी कोणते उपाय करण्यात आले आहेत, हे देशाला कळले पाहिजे, असे काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या.

भाजपने जबाबदारी झटकली
खासदार कंगना राणावत यांच्या विधानाशी भाजप सहमत नसून त्यांचे ते व्यक्तिगत मत असल्याचे पत्रक भाजपच्या वतीने आज प्रसिद्ध करण्यात आले. पक्षाच्या धोरणात्मक बाबीवर बोलण्याची खासदार कंगना राणावत यांना परवानगी नाही, आणि अशा प्रकारची विधाने करण्यासाठी त्यांची अधिकृत नेमणूकही केलेली नाही, असे भाजपने आपल्या पत्रकात म्हटले आहे. खासदार राणावत यांनी भविष्यात अशा प्रकारचे कोणतेही विधान करू नये, अशी तंबीही भाजपने दिली आहे.