डोंबिवलीतील शिवमंदिर मुक्तिधाम स्मशानभूमीच्या छताला भगदाड पडले आहे. गळतीमुळे लाकडे भिजत असून अक्षरशः छत्र्या हाती घेऊन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. त्यातच स्मशानभूमीत पावसामुळे पडलेले खड्डेही बुजवले नाहीत. कचऱ्याचे ढीग साचले आहेत. दुर्गंधीमुळे नाक मुठीत घेऊन अंत्यसंस्कार विधी पार पाडावे लागतात. केडीएमसी प्रशासनाच्या मुर्दाड कारभारामुळे मृतदेहांची हेळसांड होत असल्याने डोंबिवलीकर संताप व्यक्त करत आहेत.
शिवमंदिर स्मशानभूमी ही डोंबिवली पश्चिमेतील मध्यवर्ती स्मशानभूमी आहे. शहरातील सर्व मृतदेह अंत्यसंस्कारासाठी या स्मशानभूमीत आणले जातात. यामुळे कायमच ही स्मशानभूमी धगधगत असते. स्मशानभूमी अद्ययावत करण्यासाठी पालिकेने दीड कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. या निधीतून झालेली कामे निकृष्ट झाली आहेत. याचा पर्दाफाश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा प्रसारक आणि गरीबाचा वाडा विभागप्रमुख प्रमोद कांबळे यांनी केला आहे. शिवमंदिर स्मशानभूमीच्या छताला ठिकठिकाणी गळती आहे. सर्व10 रॅकवरचे पत्रे फुटले आहेत. गळक्या छताखाली छत्र्या हाती घेऊन अंत्यसंस्कार पार पाडावे लागतात. मृतदेहांची हेळसांड होऊ नये यासाठी ओल्या लाकडांवर सतत रॉकेलचा वापर करून अग्नी भडकत ठेवावा लागतो.
केडीएमसीच्या हलगर्जीपणामुळे मृतदेहांची हेळसांड,हीच का स्मार्ट सिटी?
शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत 29 मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले. कृष्णा गायकवाड यांच्या अंत्यसंस्काराला केडीएमसीचे जनसंपर्क विभागप्रमुख संजय जाधव आणि विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत उपस्थित होते. त्यांनी स्वतः गळतीचा अनुभव घेतला. स्मशानभूमीत येतानाच दुर्गंधी आणि डबक्यातून वाट काढत यावे लागते. स्वच्छतागृह कित्येक महिने साफ केलेले नसते. त्यामुळे हीच का स्मार्ट सिटी, असा संताप प्रमोद कांबळे यांनी व्यक्त केला.