आई… मला शाळेत नेऊ नकोस ना.. मला नाही जायचंय शाळेत.. असे ओरडत ती झोपेतून अचानक दचकून उठते.. हातवारे करते.. रडायला लागते.. त्या नराधमाने काठीच्या धाकाने माझ्या छकुलीचा लैंगिक छळ केला हो… मुलीवर घडलेला प्रसंग सांगताना तिच्या आईवडिलांच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते. आमची मुलगी यापुढे तरी सुरक्षित राहावी, तिचे कुठेही नाव येऊ नये, अशी हात जोडून विनंतीही त्यांनी केली.
पोटच्या चिमुकल्या गोळ्यावर ओढवलेला प्रसंग सांगताना आईवडिलांचे हृदय अक्षरशः पिळवटून जात होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सगळा घटनाक्रमच सांगितला. 12 ऑगस्टला माझे वडील तिला शाळेत आणायला गेले तेव्हा तिला नीट चालताही येत नव्हते. रात्री तिला ताप आला. झोपेत ती सारखी रडत होती, हातवारे करत होती. त्यामुळे माझ्या पतीला संशय आल्याने आम्ही तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो. तिथे महिला डॉक्टरने तिची तपासणी केली. तेव्हा तिला एक सेंटीमीटरपर्यंत जखम झाल्याचे आम्ही मुलीला विचारले तुला कुठे दुखतंय का, तुला कोणी हात लावला का, असे विचारले तेव्हा तिने शाळेतला एक दादा मला हात लावतो.. गुदगुल्या करतो आणि काठीने मारतो पण.. असे सांगितले.
शाळेच्या मुख्याध्यापिका आणि संस्थाचालकांनी तर आमच्या शाळेत असं घडूच शकत नाही, असे सांगून आम्हाला इथून निघून जा असे संगितले आणि बदलापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी तर आम्हाला 11 तास ताटकळत ठेवले.. आज आम्ही प्रचंड मानसिक तणावात आहोत. पण आमच्या मुलीसमोर आम्ही दाखवू शकत नाही. तिला जेवढं नॉर्मल करता येईल तेवढं नॉर्मल करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय.. पण ती रात्री झोपेतून दचकून उठते, हातवारे करते आणि मला शाळेत नेऊ नका ना असे रडून सांगते. तिचे नाव कुठेही येऊ नये कारण तिला पुढचं आयुष्य आहे. अशी हात जोडून विनंती करतानाच त्या शाळेतील सर्व मुलींचे मेडिकल चेकअप झालेच पाहिजे, अशी ठाम मागणी पीडित मुलीच्या पालकांनी केली.