देशात जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे ही मागणी काँग्रेसने सातत्याने लावून धरली आहे. आज काँग्रेसने याबाबत एनडीए सरकारला मूड ऑफ नेशन दाखवला. देशातील तब्बल 74 टक्के लोकांना जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे असे वाटत असल्याचे इंडिया टुडेच्या सर्वेक्षणाचा हवाला देत म्हटले आहे. तर याबाबत आताच काय तो निर्णय घ्या; अन्यथा पुढचा पंतप्रधान जातनिहाय जनगणनेबद्दल निर्णय घेताना दिसेल, अशा शब्दांत काँग्रेस नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सणसणीत टोला लगावला आहे.
काँग्रेसने एक्सवरून इंडिया टुडेच्या सर्वेक्षणाचा हवाला देत देशातील जनतेचा मूड नेमका काय आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाखवून दिले आहे. मूड ऑफ द नेशननुसार जातनिहाय जनगणनेची मागणी सातत्याने होत आहे. आता तब्बल 74 टक्के लोकांना जातनिहाय जनगणना व्हावी असे वाटत असून समाजात कुणाची किती लोकसंख्या आहे याचे उत्तर यातून मिळेल. तसेच कुठल्या क्षेत्रात कुणाची किती भागीदारी आहे हे सत्यदेखील देशासमोर येईल, असेही काँग्रेसने म्हटले आहे. जातनिहाय जनगणना करा आणि आमचा हक्क आम्हाला द्या अशी मागणी जनतेची आहे याकडेही लक्ष वेधण्यात आले.
जातनिहाय जनगणना रोखण्याचे स्वप्न पाहू नका -राहुल गांधी
मोदीजी, तुम्ही जर जातनिहाय जनगणना रोखण्याचा विचार करत असाल तर तुम्ही स्वप्न पाहत आहात; कारण कोणतीच शक्ती जातनिहाय जनगणना रोखू शकत नाही. हिंदुस्थानची ऑर्डर आली आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एक्सवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. हिंदुस्थानची 90 टक्के जनता लवकरच जातनिहाय जनगणनेचे समर्थन करून याबाबतची मागणी लावून धरेल. त्यामुळे ही मागणी आताच पूर्ण करा, जातनिहाय जनगणनेचे आताच आदेश द्या, नाहीतर तुम्ही पुढच्या पंतप्रधानांना याबाबत ठोस निर्णय घेताना बघाल, असा सणसणीत टोलाही राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना लगावला आहे.
सर्वेक्षण अहवाल काय सांगतो… जातनिहाय जनगणना होईल का?
मूड ऑफ द नेशन मूड ऑफ द नेशन
ऑगस्ट 2024 फेब्रुवारी 2024
74 टक्के होय 59 टक्के
24 टक्के नाही 28 टक्के
90 टक्के लोक सिस्टमचा भाग नाहीत
राहुल गांधी यांनी शनिवारी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे काँग्रेसने आयोजित केलेल्या संविधान सन्मान आणि संरक्षण कार्यक्रमातही जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली. जातनिहाय जनगणनेमुळे केवळ लोकसंख्या किंवा कोणत्या जातीचे किती लोक आहेत हे समजेल. हिंदुस्थानातील 90 टक्के लोक हे देशाच्या सिस्टमचा भाग नाहीत. यात अल्पसंख्याकदेखील येतात. मी अलीकडेच मिस इंडिया झालेल्या महिलांची यादी पाहिली. यात ना दलित तरुणी होती, ना आदिवासी, ना ओबीसी. मीडिया, चित्रपटसृष्टी आणि मिस इंडिया बनणाऱ्या तरुणींमध्ये देशातील 90 टक्के लोकांचे प्रतिनिधित्व नाही. देशाचे संविधान केवळ त्या उर्वरित 10 टक्के लोकांनी नव्हे, तर संपूर्ण 100 टक्के लोकांनी बनवले आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.