लग्नाचे आमिष दाखवून सांगलीतील एका फ्लॅटमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणी कोल्हापुरात शासकीय सेवेत असून, तिने दिलेल्या फिर्यादीची दखल घेऊन पोलिसांनी अत्याचार करणारा आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या अशा दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. सचिन संभाजी गायकवाड (वय 25, रा. घुणकी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) आणि अमोल कुरणे (रा. कुंडलवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्याचाराचा हा प्रकार मार्च 2024 ते जून 2024 या दरम्यान सांगलीत एका फ्लॅटवर घडला आहे. पीडित युवती ही कोल्हापूर येथील रहिवासी आहे. संशयित सचिन गायकवाड याने लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्याशी ओळख वाढविली. विश्वास संपादन केल्यावर संशयित सचिन याने सांगलीत शंभर फुटी परिसरातील एका फ्लॅटमध्ये तिच्यावर अत्याचार केले. काही दिवसांनी पीडितेने सचिन याला लग्नाबाबत विचारले असता, त्याने जातिवाचक टिपण्णी करून लग्नास नकार दिला.
दरम्यान, पीडित तरुणीने संशयितांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. मात्र, संशयित अमोल कुरणे याने सचिनसमवेत तुझे लग्न होणार नाही. त्या बदल्यात पीडितेस एक लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, पीडितेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव तपास करीत आहेत.