सावधान! जिओच्या नावावर फसवणूक

रिलायन्स जिओची सेवा वापरणाऱ्या ग्राहकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे. कारण, जिओच्या नावावर लाखो रुपयांची फसवणूक होत असल्याची माहिती समोर आली आहे. सायबर गुन्हेगार ग्राहकांना जाळ्यात ओढत आहेत. तसेच जिओचा प्रतिनिधी म्हणून आपली ओळख सांगून संवेदनशील माहिती चोरी करत आहेत. त्यामाध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक होत असल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर रिलायन्स जियोने स्वतः ग्राहकांना सावधान राहाण्याचा इशारा दिला आहे.

फसवणूक करणारे ग्राहकांपर्यंत अनेक मार्गांनी पोहोचतात. फोन कॉल, मॅसेज, व्हॉट्सऍप चॅट आणि ईमेलद्वारे ग्राहकांची फसवणूक करत आहेत. हे सायबर गुन्हेगार ग्राहकांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पॅन नंबर, आधार कार्ड. बँक अकाऊंट, क्रेडीट कार्ड आणि ओटीपी नंबर अशाप्रकारची संवेदनशील माहिती काढून घेत आहेत. तसेच ते थर्ड पार्टी ऍप डाऊनलोड आणि इन्स्टॉल करण्याचा सल्ला देतात.