गेल्या महिन्याच्या अखेरीस उद्भवलेली महापुराची परिस्थिती ओसरून जनजीवन पुन्हा सुरळीत सुरू असताना शुक्रवार पासून सलग दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र संततधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जनजीवनावर काहीसा परिणाम जाणवू लागला. संततधार पावसामुळे दोन दिवसात आतापर्यंत 22 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, वेदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे व कासारी नदीवरील यवलूज असे बंधारे पाण्याखाली आहेत.
दरम्यान, रविवारी सकाळी राधानगरी धरणाचा 6 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला. त्यामधून 2 हजार 928 क्युसेक विसर्ग सुरू होता. पाठोपाठ धरणाचे 3, 4, 5 क्रमांकांचे स्वयंचलित दरवाजे उघडले. त्यामधून 5 हजार 712 आणि विद्युत गृहातुन 1 हजार 500 असा एकूण 7 हजार 212 क्युसेक विसर्ग सुरू होता. कर्नाटकातील अलमट्टीतून 42 हजार क्युसेक व हिप्परगीतून 22 हजार 251 पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
रविवारी सकाळी 7 च्या अहवालानुसार, जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे टीएमसी पाणीसाठा आहे. राधानगरी – 8.33, तुळशी – 3.46, वारणा – 31.25, दूधगंगा 22.73, कासारी 2.63, कडवी 2.44, कुंभी 2.57, पाटगाव 3.48, चिकोत्रा 1.34, चित्री 1.88, जंगमहट्टी 1.22, घटप्रभा 1.30, जांबरे 0.76, आंबेआहोळ 1.24 व कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. तसेच पंचगंगा नदी वरील राजाराम बंधारा 20.1 फूट, सुर्वे 19.9 फूट, रुई 46.3 फूट, इचलकरंजी 44 फूट, तेरवाड 39.9 फूट, शिरोळ 32.6 फूट, नृसिंहवाडी 30 फूट, राजापूर 21.7 फूट तर नजीकच्या सांगली 11.9 फूट व अंकली 12.9 फूट अशी आहे.
View this post on Instagram
24 तासात एकूण 30.6 मिमी पाऊस
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 30.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गनबावडा तालुक्यात सर्वाधिक 58.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर हातकणंगले- 21.4, शिरोळ – 13.1, पन्हाळा- 29.3, शाहुवाडी- 33.9, राधानगरी- 42.6, करवीर- 27.1, कागल- 28.6, गडहिंग्लज- 21.4, भुदरगड- 37.3, आजरा-53.3 आणि चंदगड तालुक्यात 39.7 मिमी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.