खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव स्कॉर्पिओ वाहनाने दुचाकीला उडवल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन चुलतभाऊ ठार झाले. दहिवडीनजीक शेरेवाडी फाटयावर आज सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. त्यामुळे जनतेत संताप व्यक्त केला जात आहे.
अनिकेत नितीन मगर (26) व रणजीत राजेंद्र मगर (32) अशी या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चुलतबंधूंची नावे आहेत. आज सकाळी आमदार गोरे हे जनसंवाद दौऱ्यासाठी बोराटवाडी येथील आपल्या निवासस्थानातून बाहेर पडले. या ताफ्यातील काळ्या रंगाची स्कॉर्पिओ ही ताफ्यातून मागे राहिल्याने भरधाव वेगात दहिवडीच्या दिशेने जात होती. यादरम्यान स्कुटीवरुन बिदालकडे निघालेले अनिकेत नितीन मगर व रणजीत राजेंद्र मगर हे चुलतभाऊ शेरेवाडी फाटा येथे मुख्य रस्त्यावर येत होते. स्कॉर्पिओ चालकाने वेगावर नियंत्रण न ठेवता आल्याने भरधाव वेगातील स्कॉर्पिओने विरुद्ध बाजूला जाऊन दुचाकीला ठोकले. यात दुचाकीचा चक्काचूर झाला. स्कॉर्पिओने दोघांनाही सुमारे 50 मीटरपर्यंत फरफटत नेले.
यामध्ये अनिकेत आणि रणजीत दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रणजीत याचे दीड वर्षापूर्वी लग्न झाले असून तो बारामती येथे कंपनीत कामाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, आईवडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे. तर अनिकेत हा अविवाहित होता व सेंट्रिगचे काम करत होता. त्याच्या पश्चात आईवडील व भाऊ असा परिवार आहे.