जगभरातील घडामोडी

अपक्ष उमेदवाराचा ट्रम्प यांना पाठिंबा

अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणारी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आता रंगतदार वळणार येत आहे. राष्ट्राध्यक्षपदाचे स्वतंत्र उमेदवार रॉबर्ट एफ कॅनेडी ज्युनिअर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. एरिझोनामध्ये झालेल्या रॅलीत त्यांनी ही घोषणा केली. कॅनेडी यांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा जाहीर केला आहे. कॅनेडी यांनी आपली कॅम्पेन थांबवली असून ते आता निवडणुकीतून आपले नाव हटवण्याची मागणी करणार आहेत. मी जर निवडणूक लढवली असती तर याचा फायदा डेमोक्रॅटिक पार्टीच्या उमेदवार कमला हॅरिस यांना मिळाला असता. त्यामुळे मी ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे कॅनेडी यावेळी म्हणाले. कॅनेडी यांच्या या निर्णयाचा ट्रम्प यांना नक्कीच फायदा मिळणार आहे.

रोबोटच्या पुशअपची चर्चा

बोस्टन डायनामिक्सने आपला नवा रोबोट ऍटलस समोर आणला आहे. हा रोबोट खूपच अत्याधुनिक आणि उपयोगी आहे. हा रोबोट न थकता अनेक वेळा पुशअप करतो, उड्या मारतो, धावतो. या रोबोटच्या पुशअपची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हा रोबोट वेगवेगळे काम करण्यासाठी बनवण्यात आला आहे. याची डिझाईनसुद्धा आकर्षक आहे. बोस्टन डायनामिक्स एक अमेरिकी इंजिनीअरिंग आणि रोबोटिक्स डिझाईन कंपनी आहे. ऍटलस रोबोटला कठीणप्रसंगी काम करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या रोबोटचे सेन्सर्स आणि कंट्रोल सिस्टम याला स्थिर आणि संतुलित ठेवण्यास मदत करतात. हा रोबोट खूपच पॉवरफूल असून यात पॉवरफूल कॉम्प्युटर आणि जबरदस्त टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. यामधील हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर खूपच अत्याधुनिक आहे.

जस्टिन बिबर झाला ‘बाबा’

जगप्रसिद्ध पॉप गायक जस्टिन बिबर बाबा झाला. मॉडल आणि त्याची पत्नी हॅली बिबर हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही माहिती स्वतः जस्टिन बिबर याने इन्स्टाग्रामवरून दिली. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना जस्टिन बिबरने आपल्या चाहत्यांसाठी लाडक्या मुलाचा एक फोटोही शेअर केला आहे. या पोस्टमध्ये बिबरने म्हटले, वेलकम होम जॅक ब्लूज बिबर. जस्टिनची पत्नी हॅलिनेही काही तासांनंतर हाच फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोरी म्हणून ठेवला आहे. मुलाचे नाव, एक टेडी बियर सोबत निळ्या रंगाचा हृदयस्पर्धी इमोजीसुद्धा ठेवला आहे.

अभिनेता नागार्जुनच्या हॉलवर बुलडोजर

प्रसिद्ध तेलुगू अभिनेता नागार्जुनच्या हैदराबाद येथील कन्वेंशन हॉलवर बुलडोजर चालवण्यात आला. हायड्रा आणि पोलिसांनी संयुक्तीकपणे ही कारवाई केली. हा हॉल रंगारेड्डी जिह्यातील शिल्परामम या ठिकाणी होता. ही जमीन एफटीएल झोनअंतर्गत येत असल्याने हायड्राने ही कारवाई केली. एन कन्वेंशन हॉल 10 एकर जमिनीवर बनवण्यात आला होता.

11 मच्छीमारांसाठी मुख्यमंत्र्यांचे पत्र

श्रीलंकेच्या नौदलाने 11 हिंदुस्थानी मच्छीमारांना अटक केली. या मच्छीमारांवर श्रीलंकेच्या हद्दीत घुसखोरीचा आरोप आहे. या मच्छीमारांसोबत एक बोटही जप्त केली आहे. तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी शनिवारी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र पाठवून मच्छीमारांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावे, अशी मागणी केली आहे.

अफगाणी महिलांना बोलण्यावरही बंदी

अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात महिलांवरील अत्याचारांत वाढ झाली आहे. नव्या कायद्यानुसार, महिलांनी सार्वजनिक ठिकाणी गाणे गाऊ नये, कोणतेही लिखाण वाचू नये, सार्वजनिक बोलण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. पुरुषांसमोर असल्यास बुरखा घालणे बंधनकारक आहे, असे फर्मान काढले आहे.

इन्फोसिसला जीएसटीची नोटीस

आयटी सेक्टर कंपनी इन्फोसिसला 4 बिलियन डॉलरची म्हणजेच जवळपास 33 हजार 500 कोटी रुपयांची जीएसटी नोटीस पाठवण्यात आली आहे. यामुळे आयटी इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या रकमेची नोटीस पाठवल्याने आयटी इंडस्ट्रीमधून नाराजीचा सूर उमटला आहे. यामुळे केंद्र सरकार या जीएसटी नोटिसीला मागे घेण्याचा विचार करत आहे.