कोपरगाव नगरपालिकेचे फ्रुट मार्केटमध्ये साचले पाणी; तळमजल्याला स्विमिंग टॅंकचे स्वरुप

कोपरगाव शहरातील मध्यवस्तीत असलेल्या स्वर्गीय बाबू भिला वाणी फ्रुट मार्केट संकुलातील तळमजल्यावर संततधार पावसामुळे पाणी तुंबले. त्यामुळे या तळमजल्याला स्विमिंग टॅंकचे स्वरूप आले होते. नगरपालिकेच्या वतीने तेथील साचलेले पाणी काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने प्रयत्न करण्यात आले. मात्र, पाणी बाहेर काढण्याची यंत्रणा बंद असल्यामुळे पालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

आपत्ती व्यवस्थापनाकडून यंत्रणा चालू करण्यासाठी फीटर शोधण्यात तीन तास वेळ गेला. त्यानंतर मोटार सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. मात्र, ती मोटर लवकर सुरु न झाल्याने तेथील पाणी काढण्यास सुमारे चार तास विलंब झाला. कोट्यवधी रुपये खर्चून हे संकुल बांधण्यात आले आहे. मात्र अद्यापही त्यातील बहुतांशी गाळे रिकामेच आहेत. संकुलाच्या तळमजल्यात भाजी मार्केटसाठी ओटे तयार करण्यात आले आहेत. मात्र तेथे भाजी बाजार भरत नाही. भाजी बाजार नेहरू मार्केटमध्ये भरतो व आजूबाजूच्या रस्त्यावर भरवण्यात येतो. त्यामुळे तेथून ये जा करण्यासाठी फक्त पाऊलवाट राहिली आहे. वर्षानुवर्ष येथील गाळे रिकामे असल्याने व नगरपालिका प्रशासन येथील संकुलात वेळेवर साफसफाई स्वच्छता करीत नसल्याने येथे व्यापारी गाळे घेण्यास धजावत नाही. या व्यापारी संकुलाचे ड्रेनेज पाणी जाण्याचे गटारी व होल तुंबल्याने हे पाणी तेथे मोठ्या प्रमाणावर साठल्याने त्याला स्विमिंग टॅंक सारखे स्वरूप आले होते.

दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर अनेक गाळे रिकामी असल्याने तेथे शौच व मुतारीसाठी व इतर उद्योग करण्यासाठी उपयोग केला जातो. संकुलाच्या खिडक्या काचेची तावदाने, दार तोडण्यात आली आहेत. जाळे जळमटे लागली आहेत. व्यापारी संपला समोर पार्किंगसाठी मोठी जागा आहे त्या जागेत शेतकरी वर्गाचा भाजी बाजार बसवला तर त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. वर्षानुवर्ष अनेक विविध समस्यांच्या करत हे व्यापारी संकुल सापडले आहे. मुख्याधिकाऱ्यांसह नगरपालिका प्रशासन झोपलेल्या अवस्थेत असल्याची टीका नागरिकांनी केली आहे. वास्तविक जिल्हाधिकार्‍यांनी प्रत्येक ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र येथील नगरपालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार पाहता सपशेल नापास ठरली आहे त्यामुळे नागरिक व व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.