हवामान खात्याने नगर जिल्हयात मुसळधार पाउस कोसळेल असा अंदाज शुक्रवारी वर्तवला होता. त्याप्रमाणे कोपरगाव शहरासह तालुक्याला पावसाने झोडपून काढले. ईगतपुरी आणि त्रंबकेश्वर येथील पाउस प्रचंड होता त्यामुळे दारणा व गंगापूर धरण 100% भरले टक्के भरले आहे. गोदावरी नदी दुथडी भरून वाहु लागली आहे. धोत्रे परिसरात काल झालेल्या अति पावसामुळे काही शेतकऱ्यांची पिके जमीनदोस्त झाली आहेत. चारा कडवळ पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. निवासी नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांच्या प्राथमिक माहितीनुसार, काल झालेल्या पावसामुळे कोकमठाण मंडळातील वारी, सडे गावात मागुबाई भालचंद्र पडघडमल यांची कट नंबर 109 मधील विहीर पडली गेली. कोपरगाव रवंदे, पोहेगाव, सुरेगाव मंडळात चांगला पाऊस झाला, मात्र नुकसान झाले नाही. नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यातुन 16 हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडले होते.
तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदुर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू असून नाशिक व नगर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीतील विसर्गामध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 84 दिवसातील शुक्रवारचा पाऊस दणकेबाज होता. त्यामुळे शहरासह तालुक्यातील अनेक रस्त्यांची वाट लागली आहे. ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाची कामे केल्याने शासनाचा कोटीच्या कोटी रूपयांचा महसुल अक्षरक्षः पावसाच्या पाण्यात वाहून गेला आहे. 1 जुन पासुन ८४ दिवसांत नांदुर मध्यमेश्वर बंधाऱ्यातुन गोदावरी नदीतून 2 लाख 17 हजार 833 क्युसेक्स पाणी जायकवाडीकडे वाहून गेले आहे.
कोपरगाव शहरात दुपारी 4 वाजेपासुन ते रात्री साडेअकरा वाजेपर्यंत अधुन मधुन पावसाच्या संततधार सरी कोसळत होत्या. पावसाच्या सरीवर सरी कोसळत असल्यांने अनेक सखल भागासह उपनगरात देखील पाणी साठले. चालु पावसाळी हंगामातील 84 दिवसातील कोसळधार पडणारा हा पहिलाच पाउस कोपरगांवकरांनी अनुभवला. 21 ऑगस्ट रोजी मायगांवदेवी, सांगवीभुसार या भागात चांगला पाउस झाला होता. पावसामुळे काही भागातील ओढे, नाले प्रथमच वाहु लागले आहेत. गारदा नाला तीन वर्षांनी पहिल्यांदाच वाहू लागला आहे.